‘चाकोरीबाहेरचे विषय हाताळण्याचे धाडस’

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा पाचव्या वर्षांत पोहोचली आहे. ही स्पर्धा गेल्या चार वर्षांत लोकप्रिय झाली आहेच आणि विद्यार्थ्यांचा विश्वासही मिळवला आहे. राज्यभरातील आठ केंद्रांमधून अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थी हे ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या मांडवाखालून गेले आहेत. या स्पर्धेत ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या प्रत्येकाला स्पर्धेतून काही ना काही मिळाले आहे. गेल्या चार वर्षांत विजयी ठरलेल्या लोकांकिका स्पर्धेतील विजेत्यांचे हे अनुभव..

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेने मला नवी ओळख दिली. २०१४ मध्ये या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी मला उत्कृष्ट लेखनाबद्दलचा पुरस्कार मिळाला, तेव्हापासून या स्पर्धेशी कायमचा जोडला गेलो आहे. अन्य कोणत्याही एकांकिका स्पर्धेपेक्षा या स्पर्धेचे वेगळेपण सतत जाणवत राहते. विभागीय प्राथमिक फेरीत एकांकिका सादर केल्यानंतर परीक्षकांशी अनौपचारिक चर्चा करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रयोगात आपण केलेल्या चुका आणि त्यावर आवश्यक दुरुस्ती करण्याची जाणीव होते. पुढील फेरीत त्या सुधारणे शक्य होते. राज्य पातळीवरील आठ केंद्रांमधून ही स्पर्धा होत असल्यामुळे एखाद्या जिल्ह्य़ाच्या कोपऱ्यातील होतकरू मुलांनाही त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळणे शक्य झाले आहे. त्यातून अवघ्या चार वर्षांत राज्य पातळीवरील प्रतिष्ठेच्या एकांकिका स्पर्धामध्ये या स्पर्धेची गणना होऊ लागली आहे. वेगवेगळे, चाकोरीबाहेरचे विषय हाताळण्याचे धाडस मला ‘लोकांकिका’मुळेच आले. कारण या स्पर्धेत अशा विषयांना परीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही उत्तम दाद मिळते. त्यामुळे दरवर्षी तसे विषय मी आवर्जून निवडत असतो. राज्य पातळीवर निवड झाल्यामुळे खूप लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. त्यातून लेखक म्हणून ओळख निर्माण झाली. दूरचित्रवाणीवरील वाहिन्या किंवा चित्रपटासाठी लेखन करण्याबाबतही विचारले गेले. या स्पर्धेचे व्यासपीठ मोठे असल्यामुळे निरनिराळ्या महाविद्यालयांचे मित्र सहभागी झाले. नव्या ओळखी झाल्या. नवीन प्रयोग पहायला मिळाले. आता महाविद्यालयात नसलो तरी या स्पर्धेसाठी खास काहीतरी लिहिण्याचा दरवर्षी प्रयत्न असतो. या स्पर्धेने मला एक प्रकारची सकारात्मकता दिली. त्यामुळे मी या स्पर्धेशी भावनिकदृष्टय़ा कायमचा जोडला गेलो आहे. ‘कलर्स (मराठी)’च्या  ‘तुमच्यासाठी काय पण’ आणि ‘कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस’ या दोन कॉमेडी शोमध्ये मला संधी मिळाली असून ‘बॉइज टू’ या चित्रपटात मी खलनायकाची भूमिका रंगवली आहे. सध्या मुंबईत राहून या क्षेत्रात चांगल्या प्रकारे वाटचाल सुरू झाली आहे. याचे बरेचसे श्रेय अर्थात ‘लोकांकिका’ने चार वर्षांपूर्वी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाला आहे.

-ओंकार भोजने

(लेखक-दिग्दर्शक ‘कुबूल है’- डीबीजे महाविद्यालय, चिपळूण – द्वितीय क्रमांक, रत्नागिरी केंद्र.)

‘लोकांकिके’मुळे नाटक जगण्याची प्रेरणा’

दरवर्षी ‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेत नवी संहिता मांडायची असते. त्यामुळे लेखन, अभिनय, दिग्दर्शन या नाटकाच्या सर्वअंगाने नव्याने विचार करावा लागतो. तसा तो आम्ही दरवर्षी करतो. ‘भक्षक’ ही एकांकिका राज्यस्तरावर प्रथम आली. तेव्हापासून मराठवाडय़ातून येणाऱ्या एकांकिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. राज्यात आणि राज्याबाहेर या स्पर्धेतील नाटक आम्ही पुन्हा सादर करतो तेव्हा या स्पर्धेचा दर्जा किती मोठा आहे, याची चर्चा आपसूकच इतर ठिकाणीही होते. मराठवाडय़ातून येणारे विषय ताजे असतात. त्यावर केलेले भाष्यही तेवढेच प्रभावी असते. त्यामुळे ‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेतून आलेल्या कलावंतालादेखील राज्यातील अन्य स्पर्धामध्ये मानाचे पान मिळू लागले आहे.

ही स्पर्धा महाविद्यालयीन असल्यामुळे तरुणांना हक्काचे व्यासपीठ तर मिळालेच आहे. पण यानिमित्ताने आम्ही कलाकार मंडळीं वर्षभर नाटक जगतो. संहिता नवीन असल्यामुळे पहिला प्रयोग येथे होतो आणि नंतर हाच प्रयोग अनेक ठिकाणी केला जातो. देशातील वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभाग घेण्याचा विश्वासही या स्पर्धेमुळे वाढला आहे. एकूणच महाराष्ट्रातील नाटय़चळवळीला ‘लोकसत्ता लोकांकिका’मुळे नवे बळ मिळाले आहे. ही स्पर्धा प्रायोगिक नाटकांना वाव देत असून एक प्रभावी माध्यम म्हणून महाराष्ट्रात लोकमान्य झाली आहे. कलाकारांनाही ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या व्यासपीठावरून नवी ओळख मिळू लागली असून त्यातून नव्या संधीचा मार्ग खुला झाला आहे. तसा हा भाग दुष्काळी असल्यामुळे मोठय़ा कष्टाने कलावंत त्यांची कला सादर करत असतात. या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे परीक्षकही मार्गदर्शन करतात. त्याचा फायदा पुढचे प्रयोग सादर करताना होतो. ‘भक्षक’ या एकांकिकेत केलेल्या भूमिकेनंतर काही लघुचित्रपटांमध्येही बोलावणे आले. तेथे काम करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेतील अनेक कलाकारांना आता व्यावसायिक रंगभूमीवर काम मिळू लागले आहे.

-रावबा गजमल

‘भक्षक’- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,

‘कलाकार म्हणून ओळख मिळाली’

‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा आम्हा सर्वच तरुण कलाकारांसाठी फार महत्त्वाची आहे. कारण, या स्पर्धेशी ‘लोकसत्ता’ हे नाव जोडलेले आहे. या स्पर्धेला राज्यस्तरीय स्वरूप असून म्हणूनच ही स्पर्धा आव्हानात्मक आहे. स्पर्धेच्या आयोजनापासून परीक्षणापर्यंत सगळे काही चोख असते. आयोजनातील उणिवा नसतात. मनोरंजन, नाटय़ क्षेत्रातील अनेक मान्यवर ही स्पर्धा पहायला येतात. त्यामुळे सर्वच एकांकिका स्पर्धामध्ये लोकांकिका स्पर्धेचे महत्त्व वेगळे आहे. गेल्या वर्षी आमची ‘सॉरी परांजपे’ ही एकांकिका विजेती ठरली होती. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत जिंकल्यानंतर ही एकांकिका आम्ही बऱ्याच स्पर्धामध्ये केली. मात्र, लोकांकिका स्पर्धेत सादर केल्यामुळे या एकांकिकेची, त्याच्या विषयाची राज्यभरात चर्चा झाली. मला हे महत्त्वाचे वाटते. कारण ‘लोकसत्ता’सारखे मान्यवर वृत्तपत्र या स्पर्धेचे आयोजक असल्याने विषयाचे महत्त्व नेमकेपणाने पोहोचते. गेल्या वर्षी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक या दोन्ही फेऱ्यांमध्ये एकांकिका सादर झाल्यावर परीक्षकांनी आमच्याशी संवाद साधला. त्यांचे मत मांडले. त्यांच्या मताचा आम्हाला महाअंतिम फेरीसाठी फायदा झाला. महाअंतिम फेरीत विजेते ठरल्यानंतर आमच्या संघातील काही कलाकारांना टीव्ही मालिका, चित्रपटांसाठी विचारणा झाली होती. मात्र, परीक्षा आणि अन्य काही कारणांमुळे ते जमू शकले नाही. राज्यात होणाऱ्या एकांकिका स्पर्धामध्ये ‘लोकांकिका’ महत्त्वाची आणि वेगळी स्पर्धा आहे, कारण या स्पर्धेतून थेट राज्यभरात ओळख निर्माण होऊ  शकते.

-ऋषी मनोहर

दिग्दर्शक, ‘सॉरी परांजपे’ – प्रथम क्रमांक, बीएमसीसी महाविद्यालय, पुणे</p>

‘लोकसत्ता लोकांकिके’ने स्फूर्ती दिली’

पहिल्यांदाच २०१६ मध्ये महर्षी दयानंद महाविद्यालयाने (एम.डी.) ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत भाग घेतला होता. एकांकिका महाविद्यालयाच्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेली, दिग्दर्शित केली होती. त्यावेळी आम्हाला आम्ही जिंकणार, हरणार हे काहीच माहिती नव्हतं. आमच्या ‘दप्तर’ या एकांकिकेला महाराष्ट्रातून प्रथम पारितोषिक मिळाले होते. हा आम्ही विद्यार्थ्यांनी केलेला पहिला प्रयोग असल्यामुळे आमच्या कामाचे फळ मिळाले आणि जिंकल्यानंतर आम्ही खूप जल्लोष केला होता.

आमच्या प्राचार्या छाया पानसे आणि नाटय़ विभागाचे प्रमुख गणेश जोशी आम्हाला ‘लोकांकिके’साठी नेहमी पाठिंबा देतात. ‘लोकांकिके’चा चांगला परिणाम म्हणजे इतर आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धापेक्षाही इथे महाविद्यालयाचेच विद्यार्थी एकांकिका लिहून ती दिग्दर्शित करतात, एकांकिकेची प्रत्येक बाजू सांभाळतात.

इतर महत्त्वाच्या एकांकिका स्पर्धाप्रमाणेच ‘लोकसत्ता लोकांकिका’ आमच्यासाठी तेवढीच किंबहूना त्याहून अधिक महत्त्वाची आहे. मागच्या वर्षी आम्ही मुंबई विभागातून प्रथम येऊ न महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळी आमच्या एकांकिकेतअभिनय केलेल्या पूजाला सोनी मराठीवर ‘दुनियादारी’ मालिकेत संधी मिळाली. मागच्या वर्षी मला नेपथ्यासाठी विशेष पारितोषिक मिळाले त्याचा परिणाम म्हणून मला अनेक व्यावसायिक नाटकांतून संधी मिळत आहे. आता मला महाविद्यालयाच्या नाटय़ विभागात ‘प्रॉडक्शन मॅनेजर’ बनवण्यात आलेले आहे.इतर एकांकिका स्पर्धामध्ये प्रकाशयोजना, रंगभूषेचा वेगळा खर्च करावा लागतो. मात्र लोकांकिकेने विद्यार्थी नाटक करत आहेत हे पाहून आमच्यासाठी सर्व मोफत ठेवले. अशाप्रकारे विद्यार्थ्यांची काळजी घेणारी, त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी देणारी, त्यांच्यातील कलेला प्रोत्साहन देणारी ही लोकांकिका स्पर्धा आहे. लोकांकिका खूप खास आहे. यातून खूप काही शिकता आले आणि या लोकांकिकेने खूप काही मिळवूनही दिले. यंदाही आम्ही लोकांकिको स्पर्धेत भाग घेऊ न चांगले काम करून दाखवणार आहोत. आम्ही दोन महिने आधीपासून तयारी सुरू केली आहे. आम्ही ऐंशीजण एकत्र मिळून मेहनत करत आहोत. यंदाही त्याच उत्साहाने एकांकिका सादर करून महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा वाटते आहे.

-उज्ज्वल काणसकर

प्रथम क्रमांक- दप्तर- एम.डी. महाविद्यालय, मुंबई