सुहास भोसले दिग्दíशत ‘रेती’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रमोद गोरे निर्मित या चित्रपटाच्या निमित्ताने अवैध वाळू उपसा, वाळू माफिया हे आपल्याला वाचून, ऐकून माहिती झालेल्या गोष्टींचा सविस्तर पट तर डोळ्यासमोर येणे साहजिक आहे. मात्र ऐकूनही कानाडोळा करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांसाठी या समांतर सुरू असलेल्या दुष्टचक्रामुळे कोणते संकट आपल्या दारापर्यंत येऊन ठेपले आहे, याची जाणीव या चित्रपटातून पहिल्यांदाच होणार असल्याचे अभिनेता चिन्मय मांडलेकर याने स्पष्ट केले.

टीव्ही- नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून लीलया वावरणारा अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकरची ख्याती आहे. गेल्या वर्षभरात चिन्मयने ‘लोकमान्य’ या चित्रपटापासून वसंतराव नाईकांच्या चरित्रपटांपर्यंत अनेक भूमिका केल्या. याही वर्षी ‘तिचा उंबरठा’ हा त्याचा चित्रपट आधी प्रदíशत झाला आहे. मात्र ‘रेती’ हा चित्रपट वेगळा असल्याचे चिन्मयने सांगितले. प्रामाणिकपणे सांगायचं तर वाळूमाफियांसंदर्भातील अनेक घटना मीही वर्तमानपत्रांतून वाचलेल्या होत्या. मात्र या विषयाची व्याप्ती किती आहे हे मला तेव्हा जाणवलं नव्हतं. चित्रीकरणासाठी आम्ही जेव्हा वाळू उपसा केलेल्या नद्यांच्या खोऱ्यांपर्यंत पोहोचलो तेव्हा हा प्रश्न पर्यावरणाच्या दृष्टीने किती गंभीर आहे, याची जाणीव पहिल्यांदा आम्हाला झाली, असे त्याने सांगितले. यातला विरोधाभास असा की रेतीचा सर्वात जास्त वापर कुठे तर शहरांत आपल्या घरांच्या बांधकामांसाठी होतो. मात्र ही रेती कुठून येते, यामागे काय उपद्व्याप केले जातात आणि त्याचा आपल्याशी थेट संबंध कसा आहे हे जाणून घेण्याचा आपण कधीही प्रयत्न करत नाही, यावर हा चित्रपट बोट ठेवत असल्याचे चिन्मयने सांगितले.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

कथा हा कोणत्याही चित्रपटाचा जीव असतो. ‘रेती’ची देवेन कापडनीस यांनी लिहिलेली कथाच इतकी विलक्षण, थरारक आहे की या चित्रपटाला नाही म्हणणं शक्यच झालं नसतं, असं सांगणारा चिन्मय यात एका ट्रक ड्रायव्हरची भूमिका साकारतो आहे. मी शंकर या ट्रक ड्रायव्हरची भूमिका करतो आहे जो या व्यवस्थेमधील खरेतर खूप छोटा भाग आहे. उपसा केलेली रेती वाहून नेण्याचं काम तो करतो. मात्र तरीही त्याची एक महत्त्वाकांक्षा आहे, स्वप्न आहे आणि त्यासाठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी आहे. शंकरला आपला बॉस किसनची जागा घ्यायची आहे. त्याचं एका मुलीवर प्रेम आहे, तिला सोन्याने मढवायची स्वप्नं तो पाहतो आहे. म्हणजे सुरुवातीला भोळसर, निष्पाप वाटणारा शंकर हळूहळू विकृत होत जातो, अशा दोन छटा मला यानिमित्ताने रंगवायला मिळाल्या, असे चिन्मय म्हणतो.

या चित्रपटातून एक वेगळीच अनुभूती आपण घेतली असल्याचे त्याने सांगितले. मी आपल्या समाजाला झापडबंद असं म्हणणार नाही, पण आपल्यामागे काय सुरू आहे हे आपल्याला कधीच कळत नाही. आणि कुठलीही माफियागिरी ही अशीच हळूहळू वाढत असते. या चित्रपटासाठी आम्ही खऱ्या लोकेशन्सवर चित्रीकरण केलं आहे. या व्यवसायातील माणसं चेहऱ्यावरून आपल्यासारखीच सर्वसाधारण भासतात. पण, त्यांच्या व्यवसायाचा भाग म्हणून त्यांना काय काय करावं लागतं ते त्यांना भेटल्यावर सहज लक्षात येतं, असं तो म्हणतो. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर बरोबर किशोर कदम, शशांक शेंडे, संजय खापरे, सुहास पळशीकर, विद्याधर जोशी अशी अनेक मातब्बर कलाकार मंडळी एकत्र आली आहेत. हो.. इतक्या कलाकारांबरोबर एकत्र काम करण्याचा अनुभव वेगळा होता. पण जसं किशोर कदम यांच्याबरोबर मी ‘असंभव’ मालिकेत काम केलं होतं, ती जी आमची केमिस्ट्री आहे ती आजही तशीच आहे. शशांक शेंडे हे खूप हुशार आणि सहज अभिनयाची ताकत असणारे अभिनेते आहेत. त्यामुळे या सगळ्यांबरोबर काम करताना मजा आली, असे चिन्मयने सांगितले. आत्तापर्यंत काय झालं होतं.. प्रेमकथांचा एक ट्रेंड आला होता. मी त्यात कुठेच फिट बसू शकत नाही. त्यामुळे मी नवीन चित्रपट केलेच नव्हते. ‘रेती’ ही कठोर वास्तवावरची कथा आहे, त्यातील व्यक्तिरेखा खऱ्या आहेत. त्यामुळे अशाच चित्रपटांतून काम करायला आवडते. आणि आता कलाकार म्हणून माझ्या आयुष्यात जे आवडेल तेच करावं या स्तरावर मी येऊन पोहोचलो आहे. म्हणूनच तर मी यावर्षी ‘रेती’, शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’ आणि ‘धूसर’सारखे चित्रपट केले आहेत. नाटकाच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. मी चंद्रकांत कुलकर्णीचे ‘वाडा चिरेबंदी’चा दुसरा भाग ‘मग्न तळ्याकाठी’ करतो आहे. टीव्हीवरही सध्या ‘तू माझा सांगाती’ ही संत तुकारामांवरची मालिका सुरू आहे. अशा निवडक कामांतूनच आपल्याला आनंद मिळतो, असे तो मनापासून सांगतो.

सगळ्यात जास्त वेगाने बदल हे टीव्ही आणि नाटकाच्या माध्यमात येतात. चित्रपटातही ते येत असतात. मात्र बदल कुठेही, कधीही आणि कुठल्याही काळातील असोत कलाकाराला स्वत:ला त्या बदलत्या साच्यात बसवता आलं पाहिजे. याबाबतीत अमिताभ बच्चन  माझे आदर्श आहेत. काळाच्या कुठल्याही तुकडय़ात ते फिट बसतात. मलाही असेच काम करायचे आहे. नाटकाचं दिग्दर्शन तर मी करतोच, पण चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी मला थोडा वेळ हवा आहे. ‘तू माझा सांगाती’ ही माझी मालिका जेव्हा संपेल तेव्हाच दिग्दर्शक म्हणून माझ्या चित्रपटाची सुरुवात होईल.