इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट १० वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, पण एका नव्या अंदाजात.. दहा वर्षांपूर्वी दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान ही जोडी या चित्रपटात दिसली होती. आता दहा वर्षांनंतर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही नवीन जोडी ‘लव्ह आज कल’मध्ये पाहायला मिळतेय. या जोडीबद्दल चाहत्यांना कमालीची उत्सुकता असून पडद्यावरही त्यांची केमिस्ट्री लक्ष वेधून घेते.

जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दोन जोडप्यांच्या प्रेमकहाणीची झलक दाखवण्यात आली आहे. मात्र या प्रेमकथांचा काळ वेगवेगळा आहे. यात एक सध्याच्या घडीची कथा तर एक जुन्या काळातील प्रेमकथा आहे. या दोन्ही काळात प्रियकर आणि प्रेयसीची पहिली भेट अत्यंत रंजक दाखवण्यात आली आहे. मात्र त्यानंतर कथेत ट्विस्ट येतो.

आणखी वाचा : मराठी कलाकारांना चित्रपटांसाठी मिळतं इतकं मानधन

या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि कार्तिक पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या कपलच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे. कारण हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा कलाविश्वात आहेत. सारा-कार्तिकसोबतच यामध्ये रणदीप हुड्डाचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

इम्तियाज अलीने याआधी ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’, ‘हायवे’, ‘लैला मजनू’, ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या सर्व चित्रपटांमधून विविध प्रेमकथा मांडण्याचा प्रयत्न इम्तियाजने केला आहे. आता ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.