चित्रपटात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून आजवर अनेक तरुण कलाकारांना फसवलं गेलं आहे. अनेक तरुणींचं लैंगिक, आर्थिक आणि मानसिक शोषण झालं आहे. अशाच एका प्रकरणात निर्माता महेश भट्ट आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार समाज सेविका योगीता भैया यांनी एका कंपनी प्रमोटर विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. हा प्रमोटर तरुण मुलींना चित्रपटात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांना सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायला लावत होता. यादरम्यान त्या तरुणींचं लैंगिक शोषण देखील केलं जात होतं. असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी महेश भट्ट आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलासह अनेक नामांकित व्यवसायिकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.