चिन्मय पाटणकर

राष्ट्रीय पातळीवरील मानाचा ‘महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अ‍ॅवॉर्ड’ (मेटा) यंदा पुण्याच्या नाटक कंपनी या संस्थेच्या ‘आयटम’ या नाटकाला मिळाला. देशभरातल्या बारा नाटकांतून आयटम या नाटकाची सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून निवड झाली. तसंच सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी साईनाथ गुणवाडला गौरवण्यात आलं. या निमित्तानं साईनाथशी साधलेला संवाद..

नाटक कंपनीच्या नाटकाला पहिल्यांदाच नामांकन मिळालं होतं. सवरेत्कृष्ट नाटक आणि तुला सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटलं?

— खरंतर खूप कठीण आणि जबाबदारी असल्यासारखंच वाटत होतं, कारण या वर्षी आम्ही पुण्याचं प्रतिनिधित्व करत होतो. ज्या लोकांना आपण कधी पाहिलेलं नाही अशा लोकांसमोर नाटक करायचं होतं. स्पर्धेत अनेक अनुभवी मंडळी, संस्था होत्या. स्पर्धेचं असं दडपण नव्हतं. आम्ही आमच्या पद्धतीनं नाटक केलं, ते त्यांना आवडलं. सवरेत्कृष्ट नाटक, सवरेत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, सहायक अभिनेता, दिग्दर्शक आणि सेट डिझाइन अशी नामांकनं होती. त्यात नाटकाला पुरस्कार मिळल्याचा आनंद खूपच जास्त आहे. मला हा पुरस्कार मिळेल, याचा कधी विचारही केला नव्हता. राष्ट्रीय स्तरावरच्या लोकांनी, अनेक र्वष नाटक करणाऱ्या मंडळींनी आमचं नाटक पाहून आम्हाला गौरवलं, आम्ही घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं याचा आनंद आहे.

सवरेत्कृष्ट अभिनयासाठी तुझ्याबरोबर तगडी स्पर्धा होती. त्याबद्दल काय सांगशील?

— गौतम हलदर, बी. जीतेन शर्मा आणि संदीप शिखर यांना माझ्याबरोबर नामांकन होतं. त्यात संदीप हा माझा आवडता अभिनेता आहे. त्यांना तीन वेळा नामांकन मिळालं आहे. त्यांचा अभिनय पाहून मी प्रेरित झालो. पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा ते म्हणाले, ‘मला तीन नामांकनं मिळाली आणि एकदाही पुरस्कार मिळाला नाही. तुला पहिल्याच नामांकनाला पुरस्कार मिळाला.’ त्यांच्या त्या बोलण्यानं मला खूप भारी वाटलं. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘तुमच्याकडून आम्ही शिकतो, तुमच्याचकडून प्रेरणा घेतो.’ त्यांनीही अभिनंदन केलं.

सध्या कास्टिंग काऊचया विषयावर जगभरात चर्चा सुरू आहे. मी टूहा हॅशटॅग मध्यंतरी ट्रेंडिंग होता. तुमच्या नाटकातही हा विषय हाताळलाय. त्याविषयी थोडं सांग ना..

— स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं जातं. आपल्याकडेच असं नाही, सगळीकडेच.. पण ‘कास्टिंग काऊच’ला दोन बाजू आहेत. एक म्हणजे स्त्रीला तडजोड करायला लावली जाते आणि दुसरं म्हणजे स्त्रीनंच परिस्थिती स्वीकारून ते करणं. उदाहरणार्थ, एखादी अभिनेत्री आयटम साँग करते, तेव्हा तिला माहीत असतं, की याचं कशा पद्धतीनं चित्रीकरण होणार आहे, काय दाखवलं जाणार आहे वगैरे.. म्हणजेच ती स्वत:कडे प्रॉडक्ट म्हणूनच पाहते. अनेक अभिनेत्री प्लॅस्टिक सर्जरी वगैरेही करतात. ऑडिशनसाठी अभिनेत्रीला बोलावलं जाताना, काही निकष ठरलेले असतात. गोरी हवी, बारीक हवी वगैरे.. पण, हे काही सौंदर्याचे निकष असू शकत नाहीत. कास्टिंग काऊच हा विषय खूप महत्त्वाचा आणि समकालीन आहे म्हणूनच आम्ही त्यावर नाटक करायला घेतलं. सिद्धेश पूरकरनं खूप उत्तम पद्धतीनं हा विषय मांडला आहे. गेले काही दिवस कास्टिंग काऊचबद्दल चर्चा सुरू झाली आहे, कारण अभिनेत्री त्याबद्दल उघडपणे बोलायला लागल्या आहेत. आमच्या नाटकात अशाच एका अभिनेत्रीची गोष्ट मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

पुढे जाऊन या क्षेत्रात अभिनेता म्हणून काय करायची इच्छा आहे? नाटक करणार की चित्रपट, मालिका वगैरे..

— अभिनेता म्हणून मला प्रत्येक माध्यमात काम करायचं आहे. अर्थात पहिलं प्रेम नाटक हेच आहे. कारण, नाटकातून जे समाधान मिळतं, ते बाकी माध्यमांत तितकंसं मिळत नाही. चांगला विषय, चांगली भूमिका मिळाली, तर चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशा कोणत्याही माध्यमात काम करण्याची माझी तयारी आहे.

chinmay.reporter@gmail.com