काही दिवसापूर्वी केरळमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा एक संतापजनक प्रकार घडला. केरळमधील पल्लकड जिल्ह्यात स्थानिकांनी एका गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हा अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर सर्व स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यामध्येच एका दाक्षिणात्य अभिनेत्याने हा प्रकार स्थानिकांनी जाणूनबुजून न केल्याचं म्हटलं आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या घटनेविषयी त्याचं मत मांडलं आहे.

मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याने एक ट्विट करुन स्थानिकांनी हा प्रकार जाणूनबुजून न केल्याचं म्हटलं आहे. तसंच नेमकं काय झालं असावं हेदेखील त्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सध्या त्याच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर नवीन चर्चा रंगली आहे.

त्यावेळी हत्तीणीला मुद्दाम कोणीही घातक पदार्थ खायला घातला नव्हता. प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करता यावं यासाठी शेतात असे अननस ठेवले होते. मात्र तोच अननस या गर्भवती हत्तीणीने खाल्ला. हे बेकायदेशीर आहे, मात्र या भागात अनेक ठिकाणी पिकांचं रक्षण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. ही घटना पल्लकड जिल्ह्यात घडली आहे, मलप्पुरममध्ये नाही. तसंच या प्रकरणी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे, असं पृथ्वीराज सुकुमारन याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान,२७ मे रोजी हा दुर्दैवी प्रकार घडला. मल्लपूरम भागातील फॉरेस्ट ऑफिसर मोहन क्रिश्नन यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर एक पोस्ट आणि फोटो शेअर केल्यामुळे ही माहिती समोर आली. भुकेपोटी या हत्तीणीने अननस खाल्ला, मात्र हे फळ खाल्लानंतर फटाक्यांनी भरलेला अननस तिच्या पोटात फुटला. त्यामुळे तिची जीभ आणि तोंड याला मोठी दुखापत झाली. त्यामुळे तिला काही खाताही येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तिचा मृत्यू झाला.