नाटकाचे प्रयोग सुरु असताना प्रेक्षकांचे मोबाईल सातत्याने वाजत राहणं ही बाब कलाकारांसाठी नवी राहिलेली नाही. परंतु, नाटकादरम्यान फोन वाजल्यामुळे त्याचा व्यत्यय येतो. याविषयी कलाकारांनी अनेक वेळा प्रेक्षकांना फोन बंद ठेवण्याची किंवा सायलेन्टवर ठेवण्याची विनंती केली होती. मात्र त्याचा फारसा फरक पडला नाही. त्यामुळे काही दिवसापूर्वी अभिनेता सुबोध भावे प्रचंड संतापला होता. त्यातूनच ‘फोन असेच वाजत राहिले तर नाटकात काम करणार नाही’, असा इशाराही त्याने दिला होता. त्याच्या या इशाऱ्यानंतर अनेक नाट्यगृहांनी प्रवेशद्वाराजवळ फोन सायलेन्टवर ठेवण्याचे बोर्ड लावले होते. त्यानंतर आता काही नाट्यरसिकांनीही नाटकादरम्यान फोन बंद ठेवण्याची विनंती केली आहे.

काही दिवसापूर्वी सोलापूरामध्ये सुबोधच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचा प्रयोग सुरु होण्यापूर्वी एक नाट्यरसिक येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला फोन सायलेन्टवर ठेवण्याची किंवा तो बंद करण्याची विनंती करत होता. यासाठी या नाट्यरसिकाने हातात एक बोर्ड घेतला होता. या बोर्डवर ‘कृपया फोन सायलेन्टवर ठेवा अन्यथा काही काळासाठी बंद करा’, असा संदेश लिहिण्यात आला होता. विशेष म्हणजे या व्यक्तीने केलेल्या उपक्रमामुळे सुबोधने त्यांचं कौतुक केलं आहे. सुबोधने त्याच्या ट्विटरवर या व्यक्तीचा फोटो शेअर करुन त्याचे आभार मानले आहेत.

दरम्यान, नाटकादरम्यान फोन वाजल्यामुळे अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला होता. यामध्ये अभिनेते विक्रम गोखले, अभिनेता सुमित राघवन यांच्यासह अनेक कलाकरांचा समावेश आहे.