22 April 2019

News Flash

Happy Diwali 2017 : पहिला पाडवा विरहाचा

'एकमेकांसोबत वेळ घालवणं हेच सध्या मोठं गिफ्ट असणार आहे.'

अक्षया गुरव, भूषण वाणी

दिवाळी हा सण आनंदाचा, रोषणाईचा, जल्लोषाचा. घराबाहेर सुरेख रांगोळी काढून, छान दिव्यांची आरास करून, गोडधोडाच्या फराळावर ताव मारून, आपल्या प्रेमाच्या माणसांसोबत साजरा करण्याचा हा सण. दु:खाचा लवलेशही न राहता या दिवसांमध्ये संपूर्ण वातावरणात गोडवा पसरलेला असतो. त्यातही पाडवा हा तर दिवाळीतला सगळ्यात गोड दिवस. जोडीदाराबरोबर साजरा करण्याचा त्याच्या किंवा तिच्याप्रती प्रेम, आदर व्यक्त करण्याचा. त्यातून नव्यानं जुळलेल्या नात्यात तुम्ही असाल तर दिवाळीचा पाडवा नक्कीच स्पेशल असतो. अशा वेळी तुमचे लाडके सेलिब्रिटी नक्की काय करत असतात, त्यांचा हा स्पेशल पाडवा कसा असेल याची उत्सुकता तुम्हाला लागून राहिलेली असेलच ना…’लव्ह लग्न लोचा’ या मालिकेत सौम्या हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया गुरवचा लग्नानंतरचा हा पहिला पाडवा. यावर्षी मे महिन्यात सिनेमॅटोग्राफर भूषण वाणी याच्यासोबत अक्षया विवाहबंधनात अडकली. अक्षयासाठी ही दिवाळी खूप स्पेशल आहे. ही दिवाळी तिच्यासाठी का खास आहे, पाडव्याचे तिचे काय प्लान्स आहेत, हे स्वत: तिने आमच्यासोबत शेअर केले आहे.

‘माझा जोडीदारसुद्धा याच क्षेत्रातला आहे. त्यामुळे शूटिंगमध्ये तो खूप व्यग्र आहे. गेल्या आठवड्यात आम्हाला वेळ मिळाला तेव्हा एका मॉलमध्ये सहज फिरायला गेलो होतो. दिवाळीत एकत्र पुन्हा वेळ मिळेल की नाही म्हणून तेव्हाच त्याने मला एक सुंदर पंजाबी ड्रेस घेऊन दिला. हे त्याच्याकडून मला दिवाळीची भेटवस्तू आहे. दागिनेसुद्धा मला घ्यायचे आहेत. पण पाडव्याच्या दिवशीच त्याला शूटिंगला जावं लागत असल्याने दागिने खरेदीसाठीही वेळ मिळणार नाही. पाडव्याला आम्ही एकमेकांसोबत नाही याचं दु:खही आहे. पण शेवटी कामसुद्धा महत्त्वाचं आहे.’

वाचा : सेलिब्रिटी रेसिपी : अलका कुबल सांगताहेत त्यांच्या आवडत्या पदार्थाची रेसिपी

‘पाडवा म्हटलं की दागिन्यांची खरेदी येतेय. दागिन्यांमध्ये मला डायमंडच्या अंगठ्या खूप आवडतात. आता हातात घालायच्या मंगळसूत्राची फॅशन आली आहे. हे मंगळसूत्र तो मला गिफ्ट करणार असल्याचं त्याने मला म्हटलं आहे. दिवाळीत वेळ न मिळाल्याने दिवाळीनंतर मग आम्ही शॉपिंग करू. त्यानंतर गोवा किंवा मालदीवला फिरण्याचाही प्लान करू. एकमेकांसोबत वेळ घालवणं हेच सध्या मोठं गिफ्ट असणार आहे. ‘

First Published on October 20, 2017 4:26 am

Web Title: marathi actress akshaya gurav first diwali after marriage diwali padwa