आपल्या प्रिंट्ससाठी प्रसिद्ध असलेली डिझायनर मसाबा गुप्ता पहिल्यांदाच एका स्पोर्ट्सवेअर कलेक्शन घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजचे महान फलंदाज आणि मसाबाचे वडील व्हिवअन रिचर्ड्स हे मसाबाच्यासोबत या कलेक्शनमध्ये डिझायनरची भूमिका पार पाडणार आहेत. मसाबाने आपल्या ‘ट्विटर अकाऊंट’वर याची घोषणा केली आहे.
अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटपटू विव्ह रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने ‘स्पोर्ट्सवेअर कलेक्शन’ काढण्याची इच्छा काही महिन्यांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर तिने शुक्रवारी संध्याकाळी ‘‘लवकरच आपण नवीन स्पोर्ट्सवेअर कलेक्शन घेऊन सर्वासमोर येणार असून विशेष म्हणजे एका जागतिक किर्तीच्या खेळाडूची मला साथ लाभली असल्याचे,’’ ट्विटरवर जाहिर केले होते. त्यानंतर शनिवारी तिने हा खेळाडू इतर कोणी नसून आपले वडील विव्ह रिचर्ड असल्याचे घोषित केले आहे. या कलेक्शनचे नाव ‘मसाबास्प्रिंट’ असे आहे. मसाबा तिच्या भन्नाट आणि युथफुल प्रिंट्स, फेमिनीन लुकसाठी फॅशन जगतात ओळखली जाते. त्यामुळे या स्पोर्ट्सवेअर कलेक्शनमध्ये तिच्यातील तरुण डिझायनरची आणि विव्ह रिचर्ड यांच्या खेळातील अनूभवाची एकत्रित झलक पहायला मिळेल हे मात्र नक्की. २००९ मध्ये फॅशन जगतात पदापर्ण केल्यानंतर मसाबाने तिच्या टेबलफॅन, घडय़ाळ अशा भन्नाट प्रिंट्सपासून बनवलेल्या साडय़ांनी सर्वाना वेड लावले होते. आज ती आधुनिक भारतीय फॅशनचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखली जाते. सध्या ती प्रसिद्ध ‘ब्रॅण्ड सत्या पॉल’ची क्रिएटीव्ह हेड असून त्याचबरोबर स्वत:चा ‘मसाबा’ हा बॅण्डही लिलया सांभाळते आहे.