आपल्या अफलातून नृत्यशैलीने हिप-हॉप डान्समधील पट्टीचे डान्सर मायकल जॅक्सन हे नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी आग्रस्थानी राहिले आहेत. ‘फोर्ब्स’ या मासिकाने त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एक यादीमध्ये जगप्रसिद्ध ‘पॉप सम्राट’ मायकल जॅक्सन यांना अग्रस्थानी ठेवले आहे. या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणत्याही दिवंगत सेलिब्रिटी अथवा कलाकाराच्या तुलनेत मायकल जॅक्सन यांची कमाई सर्वात जास्त आहे. या यादीतील वार्षिक अहवालानुसार प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये ‘एमजे’ यांनी तब्बल ८२.५ कोटी डॉलर्स इतकी कमाई केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे याच कमाईच्या बळावर मायकल जॅक्सन यांचे नाव या यादीत अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

२००९ मध्ये या जगप्रसिद्ध ‘पॉप डान्सर’चा मृत्यू झाला होता. तेव्हापासून मायकल जॅक्सन या यादीमध्ये अग्रस्थानी आहेत. दरम्यान, मायकल जॅक्सन यांची चांगली मैत्रिण आणि अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांच्या मृत्युनंतर २०१२ ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये त्या अग्रस्थानी होत्या. पण, यंदाच्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मृत्युनंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांना १३ वे स्थान देण्यात आले आहे.

गायक एल्विस प्रेस्ली आणि प्रिन्स यांना पहिल्या पाच नावामध्ये स्थान देण्यात आले आहे. तर जॉन लेनन आणि बॉब मार्ले यांना पहिल्या दहा नावांमध्ये स्थान देण्यात आले आहे. फोर्ब्स या मासिकाद्वारे विविध प्रकारच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातात. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या या विविध याद्यांची नेहमीच चर्चा असते.