जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवण्याच्या हेतूने निर्माते हल्ली कलाकारांनाच चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाजारात उतरवतात. मग हे कलाकार आपल्या चित्रविचित्र कृती आणि विधानांमधून प्रेक्षकांचे लक्ष चित्रपटाकडे वळवून घेतात. परिणामी चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. अभिनेत्री मिला कुनिसनेदेखील जाहिरातीचा हा प्रचलित फंडा वापरून कुत्रे व लहान मुलांमध्ये काही विशेष फरक नाही असे वादग्रस्त विधान करत समस्त पालक वर्गाचे लक्ष स्वत:कडे आणि पर्यायाने तिच्या ‘अ बॅड मॉम्स ख्रिसमस’ या आगामी चित्रपटाकडे वळवले आहे. लासवेगास येथील पत्रकार परिषदेत तिने हे विधान केले. आज पाश्चात्त्य देशांमध्ये लहान मुलांना सांभाळण्यासंदर्भात काही विशेष शिकवणी वर्ग घेतले जातात. अनेक स्त्रिया आपल्या मुलांचे पालन-पोषण उत्तम प्रकारे करता यावे या हेतुने वर्गात हजेरी लावतात. तेथे त्यांना मुलांना कपडे घालण्यापासून त्यांचे स्वभाव ओळखण्यापर्यंतचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते. पण अनेक जण या वायफळ कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन आपला वेळ व ऊर्जा वाया घालवतात, असे मिलाचे म्हणणे आहे. तिच्या मते कुत्रे सांभाळणे व लहान मुलांचे पालन-पोषण यात बरेच साम्य आहे. दोघांनाही निरोगी ठेवण्यासाठी उत्तम आहार द्यावा लागतो. त्यांची निगा राखावी लागते. त्यांच्या आवडी-निवडी सांभाळाव्या लागतात. त्यांच्यावर योग्य संस्कार करावे लागतात. त्यामुळे सर्वात प्रथम पालकांनी एखादा कुत्रा पाळावा. त्यातून त्यांना मुले सांभाळण्याचा सराव करता येऊ शकतो. तिच्या या मुक्ताफळांमुळे तेथील प्रेक्षकवर्ग कमालीचा अवाक झाला आहे. या विधानामुळे समाजमाध्यमांवर तिच्याविरोधात टीकेची एकच लाट उसळली असून अनेक पालकांनी तिच्या मानसिकतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. काही अमेरिकन स्वयंसेवी संस्थांनी आणखी पुढे जात ‘अ बॅड मॉम्स ख्रिसमस’ या चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. मिलाच्या विधानामुळे पालकांचे कोय होईल ते होईल पण चित्रपटाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे हे नक्की!