उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला. या गुंडाच्या आयुष्यावर आधारित आता एका चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. चित्रपट निर्माता मनीष वात्सल्य याने या चित्रपटाची घोषणा केली. या आगामी चित्रपटाचं नाव त्याने ‘हनक’ असं ठेवलं आहे.

अवश्य पाहा – “हे सारं कल्पनेच्या पलिकडलं”; मुंबईत नसतानाही अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मनीषने या चित्रपटाची घोषणा केली. तो म्हणाला, “मी विकास दुबेला गेल्या अनेक वर्षांपासून फॉलो करत आहे. त्याने केलेले गुन्हे, त्याच्यावर सुरु असलेले खटले, उत्तर प्रदेशात त्याने निर्माण केलेली दहशत यांच्यावर मी खूप बारकाईने संशोधन केलं आहे. त्याच्या आयुष्यावर एक क्राईम थ्रिलर चित्रपट तयार करता येऊ शकतो असं मला अनेकदा वाटायचं. सध्या एका दिग्दर्शकासोबत माझी चर्चा सुरु आहे. लवकरच आम्ही विकास दुबेवर एक चित्रपट घेऊन येत आहोत.”

अवश्य पाहा – ‘गरीबांवर असा अत्याचार भारतातच होऊ शकतो’; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका

विकास दुबे उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड होता. २ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १० जुलै रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांचं एक विशेष पथक त्याला कानपूरला घेऊन जात होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. दरम्यान संधी साधून पोलिसांवर हल्ला करत विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं.