रेश्मा राईकवार

धर्म-सत्ताकारण आणि त्याच्याशी जोडला गेलेला भवताल यावर कधी उपहासात्मक तर कधी गंभीरतेने भाष्य करणाऱ्या चित्रपट-वेबमालिकांची सध्या एकच लाट आली आहे. आशीष शुक्ला दिग्दर्शित ‘बहुत हुआ सन्मान’ हा या लाटेतला सर्वार्थाने ताजा चित्रपट म्हणता येईल. ‘डिस्ने हॉटस्टार’वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील मुख्य कलाकार तुलनेने नवीन आहेत. संजय मिश्रा, राम कपूरसारख्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या जोडीला नवे कलाकार, चुरचुरीत संवाद, मधूनमधून केलेली जुन्या गाण्यांची पेरणी आणि कॉमिक  शैलीचाही वापर यामुळे खुसखुशीत, नर्मविनोदी धाटणीचा हा चित्रपट तुम्हाला गुंतवून ठेवतो.

उत्तर भारत वाराणसी विद्यापीठाचे अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षांत शिकणारे दोन तरुण हे या कथेच्या केंद्रस्थानी आहेत. बोनी (राघव जुयाल) आणि फंडू (अभिषेक चौहान) हे दोघेही सगळ्यात नाराज विद्यार्थी. संपूर्ण महाविद्यालयातून नापास झालेले हे दोघे वगळता इतरांना सगळ्यांनाच कॅम्पस मुलाखतीतून नोकऱ्या मिळणार आहेत. दुसऱ्यांच्या या आनंदाचा हा ताण सहन न झालेल्या या दोघांना त्यातून बाहेर पडण्यासाठी बकचोद बाबा (संजय मिश्रा) एक वेगळाच मार्ग दाखवतात. विद्यापीठाच्या आवारात असलेली बँक लुटायचा प्रस्ताव बाबा या दोघांसमोर ठेवतात. बँक लुटायची योजना आखण्यापासून ते ती प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा प्रयत्न या तिघांना आणखी एका नव्या संकटात ढकलतो. हे संकट फक्त या तिघांपुरते मर्यादित राहात नाही, तर हे सगळ्या देशातील लोकांशी जोडलेलं आहे. रूढार्थाने बोनी आणि फंडू हे काही असामान्य तरुण नाहीत. त्यामुळे कुठलाही हिरोगिरीचा प्रयत्न न करता सतत संकटांच्या मालिकांमध्ये अडकणाऱ्या बोनी आणि फंडूची नैय्या तीराला लागते का? वरवर अशी सर्वसाधारण कथा घेऊन आलेल्या या चित्रपटात दिग्दर्शकाने तत्त्वांची, समस्यांची खुबीने पेरणी केली आहे. अविनाश सिंग आणि विजय नारायण वर्मा यांनी वेगवेगळे विषय घेऊन ही कथा खेळवत ठेवली आहे. मुळातच विनोदी धाटणीच्या या कथेतून गंभीर विषयावर भाष्य करताना दिग्दर्शक आशीष शुक्ला यांनी केलेली हटके  मांडणी आपल्याला चित्रपटात गुंतवून ठेवते. मात्र हाच विनोदी धागा या गंभीर विषयात खोलवर न जाता त्याला हलक्याफु लक्या गोष्टीपर्यंत मर्यादित ठेवतो.

आशीष शुक्ला यांनी याआधीही काही वेबमालिकांचे दिग्दर्शन के ले आहे. साहाय्यक  दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांचे अनुभवी दिग्दर्शन आणि मांडणीतील हातोटी या चित्रपटाच्या विषयाला अधिक रंगतदार करणारी झाली आहे. धर्माच्या आधारे सामान्यजनांची फसवणूक करणारा कोणी एक बैरागी बाबा, त्याच्याशी जोडलं गेलेलं सत्ताकारण-मंत्री, या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेली कोटय़वधी जनता, भांडवलशाही संपवायचा निर्धार करून छुपेपणाने वावरणारे क्रांतिकारी बाबा अशा अनेक व्यक्तिरेखा या चित्रपटात येतात. त्यातही नोकरी-पैसा या एकाच चक्रात अडकलेली आणि वास्तवापासून दूर असलेले बोनी आणि फंडूसारखे अनेक तरुण आहेत. एका मोठय़ा घोटाळ्याचे पुरावे हातात आहेत, मात्र त्याचं नेमकं  क रायचं काय? यावरून गोंधळणारी तरीही धीट, कर्तव्यदक्ष अशी बॉबी नामक पोलीस अधिकारी यात आहे. या सगळ्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथा एकमेकांत गुंतलेल्या आहेत. त्यामुळे चित्रपट पाहताना सुरुवातीला बोनी-फंडू-बाबा या त्रयीभोवती फिरणारी कथा सतत नव्या व्यक्तिरेखा आणि नवे धक्के देत राहाते. याआधी म्हटल्याप्रमाणे दिग्दर्शकाने चित्रपट खेळता ठेवला असल्याने कुठेही त्याचा कंटाळा येत नाही, मात्र त्यातून मांडलेला विषयही तोंडी लावण्यापुरताच मर्यादित राहतो. संजय मिश्रांनी साकारलेल्या भूमिका पाहाणं ही पर्वणी असते. इथेही त्याचा प्रत्यय येतो. त्यांना राघव जुयाल आणि अभिषेक चौहान या दोन्ही तरुण कलाकारांची चांगली साथ मिळाली आहे. बॉबीची भूमिका साकारणारी निधी सिंगही यात लक्ष वेधून घेते. तर आत्तापावेतो विनोदी, सोज्वळ भूमिकांमधून प्रामुख्याने लोकांसमोर आलेला अभिनेता राम कपूर यांना यात खलनायक तेही सुपारी घेऊन मारणारा थंड डोक्याचा खुनी म्हणून पाहाता येणार आहे. या गमतीशीर कथेला कलाकारांच्या अभिनयाची जोड मिळाली असल्याने ‘बहुत हुआ सन्मान’ हा चित्रपट रंजक झाला आहे. मात्र कथाविषय-मांडणी, अभिनय सगळ्यात सरस असूनही चित्रपट घटकाभराचे मनोरंजन यापलीकडे जात नाही, याची खंत वाटते.

बहुत हुआ सन्मान

दिग्दर्शक- आशीष आर. शुक्ला

कलाकार- राघव जुयाल, अभिषेक चौहान, संजय मिश्रा, निधी सिंग, राम कपूर, नमित दास, फ्लोरा सैनी.