वेश्याव्यवसाय सांभाळणारी मालकीण. जिची कित्येक हिंदी चित्रपटांमधून आपल्याला कोठेवाली अशीच ओळख आहे. तिच्या हाताखाली काम करणाऱ्या इतर वेश्या, त्यांचं स्वत:चं एक वेगळं भावविश्व, त्यांचं रक्षण करणारा कोणीएक आणि त्यांचं दु:ख समजून घेऊन त्यांच्याबरोबर जगू शकेल असा कोणीएक .. ही मोट आपल्याला अनोळखी नाही. थेट तुलना क रायची झाली तर श्याम बेनेगल यांच्या ‘मंडी’चीच गोष्ट नव्या चेहऱ्यांनिशी समोर यावी इतकं साधम्र्य ‘बेगम जान’मध्ये आहे. तरीही बेगमची गोष्ट वेगळी ठरते कारण इथे बेगमच्या कथेला भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी बदलत गेलेल्या राजकीय-सामाजिक समीकरणांची पाश्र्वभूमी आहे. आणि त्या नात्याने सत्ता-अहंकारांच्या नादात माणूसच माणसाची किंमत विसरून होत्याचं नव्हतं करून टाकतो, त्याचीही गोष्ट आहे. मात्र इतक्या समांतर जोडकथांच्या तुकडय़ांत ‘बेगम’चा खरा जीव घुसमटला आहे.

‘बेगम जान’ची सुरुवातच फाळणीच्या संदर्भापासून होते. देश स्वातंत्र्य मिळवण्याच्या अखेरच्या टप्प्यात असल्यापासून ते भारत-पाकिस्तान फाळणीचा निर्णय आणि त्यासाठी एकाच प्रांताचे दोन तुकडे करण्यासाठी आसुसलेली सीमारेषा.. सर रॅडक्लिफ यांच्या नावाने ओळखली गेलेली ही रेषा जेव्हा जमीन चिरत गेली तेव्हा फक्त दोन प्रांत विभागले गेले नाहीत. तिथल्या लोकांची मनं पहिल्यांदा दुभंगली, विचार दुभंगले आणि मग त्यातून जी कृती उमटत गेली ती मानवतेला काळिमा फासणारी होती, हे खरं म्हणजे चित्रपटाचं मुख्य सूत्र म्हणता येईल. ‘बेगम जान’ची कोठी नेमकी अशीच या सीमारेषेच्या मुळावर आली होती. लोकांच्या शारीर भुकेचा तामझाम सांभाळणारी कोठी गावकुसाबाहेर आहे. या कोठीच्या आसपास दूरवर काहीही दिसत नाही. त्यामुळे कोठीत बेगम आणि तिच्या हाताखाली असणाऱ्या स्त्रियांचं एक वेगळं विश्व दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी रंगवलं आहे. पण दुर्दैव असं की जी कोठी ना आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी येणाऱ्या गिऱ्हाईकाचा जात-धर्म विचारते, ना तिथे येणारं गिऱ्हाईक आपली भूक शमवणारी समोरची स्त्री कुठल्या जातीची आहे याचा विचार करतं.. ती जागा दोन धर्माच्या वादामुळे पहिल्यांदा विभागली जाणार आहे. मात्र पुरुषाला धर्म असतो, स्त्रीला एकच शरीरधर्म असतो असं मानणारी बेगम जान (विद्या बालन) कोठी हाच आपला देश आहे. माझं शरीर, माझे नियम, माझं घर, माझा देश या एकाच हट्टाने शेवटपर्यंत कोठी या सीमारेषेच्या वादात दुभंगू नये म्हणून लढा देते. तिच्या लढय़ात केवळ तिच्यामुळेच वेश्या व्यवसाय करत असूनही आजवर स्वातंत्र्यात आणि प्रेमाने जगू शकलेल्या जमिला (प्रियांका सेठिया), रुबिना खान (गौहर खान), अम्मा (इला अरुण) आणि तिच्या इतर सहकारीही सहभागी होतात. कोठी हे त्यांचं अस्तित्व आहे आणि आपल्या अस्तित्वासाठी शेवटपर्यंत लढणाऱ्या या सगळ्या जणी अखेरीस शत्रूपुढे नमतं न घेता जळत्या कोठीत उडी घेत मृत्यू स्वीकारतात. या शेवटाला दिग्दर्शकाने राणी पद्मावतीच्या जोहारची उपमा दिली आहे. खरं म्हणजे बेगम आणि इतरांचा हा भावनिक संघर्षच मुळात इतका स्फोटक आहे की तो दिग्दर्शकाने रंगवला असता तरीही तो प्रेक्षकांना भिडला असता.

पण ‘बेगम जान’मध्ये फक्त या संघर्षांची कथा उरत नाही. बेगमच्या वाटय़ाला आलेला हा संघर्षच मुळात राज्यकर्त्यांच्या फाळणीच्या अविचारी निर्णयातून जन्माला आला आहे. मुळात कोठीबाहेरच्या जगाशी ज्यांचा संबंधच नाही, ज्या जगात त्यांची माणूस म्हणूनही दखल घेतली जात नाही. त्या जगाने घेतलेल्या एका निर्णयामुळे आपलं कोठीतलं जग उद्ध्वस्त होऊ नये म्हणून लढणारी बेगम मग त्यासाठी तिला आजवर आश्रय देणाऱ्या राजाकडे (नसीरुद्दीन शहा) दाद मागते. यानिमित्ताने, स्त्रीकडे फक्त भोगवस्तू म्हणून पाहणाऱ्या व्यक्तीचं प्रतीक राजाच्या रूपाने चित्रपटात येतं. त्याचवेळी स्वाभिमानी बेगमची व्यक्तिरेखा रंगवताना दिग्दर्शकाने बेगमची राजाचं प्रेम मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आणि कित्येक वेळा लाथाडल्यानंतरही आपली कोठी वाचवण्यासाठी करावी लागणारी राजाची लाचारी या वास्तवतेवरही दिग्दर्शकाने बोट ठेवलं आहे. रुबिना-सुजीतचं कोठीतल्या दु:खातही फुलणारं प्रेम, वरवर शांत-विचारी वाटणाऱ्या मास्तरची बेगमला मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आणि तिने नकार दिल्यानंतर त्याच्या मनात पेटून उठलेली सूडाची भावना हाही या कथेचा एक धागा आहे. सीमारेषा प्रत्यक्षात यावी म्हणून एकत्र काम करणारे दोन वेगवेगळ्या धर्माचे सरकारी अधिकारी, जे एकेकाळचे खूप चांगले बालमित्र आहेत. मात्र फाळणीच्या निर्णयामुळे इलियास (रजित कपूर)आणि हरीप्रसाद (आशीष विद्यार्थी) यांच्यातली मैत्रीही लोप पावून ते एकमेकांचे शत्रू म्हणूनच काम करताना दिसतात. अशा अनेक भावभावनांचा गोफ एकाच कथेच्या अनुषंगाने विणताना काही अतिशय सुंदर संवाद चित्रपटात आहेत. विशेषत: विद्या बालनच्या तोंडी येणारा ‘महिन्याची आठवण करून देऊ नका, तो चांगला लक्षात राहतो, दरवेळी आला की लाल करून जातो’, सारखे थेट-भेदक संवाद चित्रपट पाहताना विचार करायला लावतात. त्यात विद्या बालनच्या प्रमुख भूमिकेसह इतर सगळ्याच भूमिकांमध्ये असलेले तोडीचे कलाकार हा चित्रपट जिवंत करतात. चंकी पांडेने साकारलेल्या कबीरचाही इथे आवर्जून उल्लेख करायला हवा.  मात्र त्यांना गाण्यांची साथ फोर चांगली लाभलेली नाही. त्यातल्या त्यात विद्या बालनच्या तोंडी असलेले ‘प्रेम में तोरे’, ‘होली खेलें’ आणि शेवटी येणारे ‘यह सुबह हमींसे आएगी’ ही तीन गाणी श्रवणीय झाली आहेत. मात्र बेगमच्या कथेचेही दिग्दर्शकाने असे तुक डे तुकडे केल्याने त्याची नाटय़मय मांडणी चित्रपटाचा प्रभाव मर्यादित करते.

चित्रपट :  बेगम जान

  • निर्माता – विशेष फिल्म्स, प्ले एंटरटेन्मेट
  • दिग्दर्शक – श्रीजीत मुखर्जी
  • कलाकार – विद्या बालन, गौहर खान, पल्लवी शारदा, इला अरुण, मिष्टी, विवेक मुश्रन, चंकी पांडे, रजित कपूर, आशीष विद्यार्थी, नसीरुद्दीन शहा, राजेश शर्मा.