सध्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेलेल्या प्रेक्षकांना इंटरव्हलमध्ये भाजप आणि मोदींच्या प्रचार मोहिमेचे गाणे बघायला मिळत आहे. एरवीदेखील प्रभाव आणि आक्रमक प्रचारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भाजपकडून मोदी सरकारच्या कामांचे ‘प्रमोशन’ करण्यासाठी ही नवीन क्लुप्ती शोधून काढण्यात आली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात मोदींनी केलेल्या कामाचे गुणगान असलेल्या या व्हिडिओची निर्मिती सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याकडून करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींनी देशासाठी केलेल्या कार्याबद्दल आभार मानण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केल्याचे निहलानी यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत देशभरात सुरू असलेल्या असहिष्णुता वादाच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओतील पात्रे लक्ष वेधून घेणारी आहेत. यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे तीन तरूण दाखवण्यात आले आहेत. हे तिन्ही तरूण मोदींनी केलेल्या कामाची गाण्याच्या माध्यमातून प्रशंसा करताना दिसतात. याशिवाय, मोदींचे परदेश दौरे, ओबामा आणि पुतीन यांच्याबरोबरील भेटीची दृश्येही व्हिडिओत दाखविण्यात आली आहेत.
पहलाज निहलानींकडून तयार करण्यात आलेले हे गाणे देशभक्तीपर असून निहलानींनी केलेल्या प्रामाणिक विनंतीवरूनच ‘प्रेम रतन धन पायो’च्या इंटरव्हलमध्ये हे गाणे प्रदर्शित करण्यास आम्ही राजी झाल्याचे राजश्री प्रॉडक्शनकडून सांगण्य़ात आले. पीव्हीआर, आयनॉक्स आणि कार्निव्हल यांच्या मालकीच्या चित्रपटगृहात हा व्हिडिओ प्रदर्शित केला जात असल्याचेही राजश्री प्रॉडक्शनकडून सांगण्यात आले.