अभिनेत्री सोहा अली खान हिचा ‘जो भी करवा लो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. या चित्रपटातील सोहा अली खानची व्यक्तीरेखा दबंग चित्रपटातील सलमान खानच्या चुलबुल पांडे या व्यक्तीरेखेशी निगडीत आहे. सोहा अली खान या चित्रपटात पोलिस अधिकारी शांती प्रियाच्या भूमिकेत दिसणार आहे. “माझ्या भूमिकेला घेऊन मी भरपूर उत्साही आहे, कारण पहिल्यांदाच मी अँक्शन आणि विनोदी यांची सरमिसळ असलेली भूमिका साकारणार आहे. माझी भूमिका सलमान खानच्या चुलबुल पांडे सारखी आहे आणि मी सलमानकडूनच प्रेरणा घेतल्याचं सोहा अली खानने पीटीआय समोर स्पष्ट केले. मी सलमानची नेहमी प्रशंसा करत आली आहे. मी जेव्हा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट पाहिला होता तेव्हा मी सलमानच्या प्रेमात पडली होते. मी आजवर सलमानसोबत काम केले नसले तरी सलमानने माझी अनेक वेळा प्रशंसा केलेली आहे, असंही ती पुढे म्हणाली.
दिग्दर्शक समीर तिवारी यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात परेश रावल, अर्शद वारसी आणि जावेद जाफरी यांच्यासुद्धा भूमिका असणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातील भूमिकेसाठी सोहा अली खानने प्राथमिक तत्वावर मार्शल आर्टचे ही प्रशिक्षण घेतले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 3, 2012 6:27 am