#MeToo या मोहिमेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतली भांडणं चव्हाट्यावर आली आहेत. लोक याचा आनंद घेत आहेत हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया बॉलिवुडचा जग्गूदादा अर्थात जॅकी श्रॉफने दिली आहे. सुभाष घई, नाना पाटेकर, साजिद खान यांची नावे मीटू प्रकरणात पुढे आली. लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप काहींनी या तिघांवर केले आहेत. यांच्याशिवाय इतरही काही महिलांनी इतर कलाकारांवरही आरोप केले आहेत. हे सगळे दुर्दैवी आहे असे जॅकी श्रॉफने म्हटले आहे.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका शॉर्ट फिल्मच्या कार्यक्रमात जॅकी श्रॉफ पोहचले होते. तिथे त्यांना सोशल मीडियावर सुरु असलेल्या मीटू या मोहिमेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपले मत व्यक्त करत हे सगळे दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं आहे. एकमेकांची उणीधुणी चव्हाट्यावर आणली जात आहेत आणि लोक तमाशा पाहात आहेत ही बाब चांगली नाही असंही जॅकी श्रॉफने म्हटलं आहे.

काम करण्याच्या जागी महिलांचं शोषण होणं ही बाब चांगली नाही, त्याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. जर असे काही प्रकरण समोर आले तर त्याविरोधात कठोर कारवाई केली गेलीच पाहिजे. लैंगिक शोषण होत असेल तर ते सहन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की आपल्याला महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करावे लागेल असेही जॅकी श्रॉफने म्हटले आहे.

अभिनेत्री दिव्या दत्तानेही हे सगळे प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात कदाचित आणखी नावंही समोर येऊ शकतात. महिला पुढे येऊन बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे असेही दिव्या दत्ताने म्हटले आहे. #MeToo या मोहिमेत आत्तापर्यंत नाना पाटेकर, आलोकनाथ, सुभाष घई, कैलाश खेर, अभिजीत, भूषण कुमार, विकास बहल, पियुष मिश्रा अशा अनेकांची नावे समोर आली आहेत. या सगळ्यांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले आहेत.