अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण २५ जुलै रोजी एका खास कार्यक्रमात करण्यात येणार आहे. नाटय़ परिषदेतर्फे नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदाचा कार्यक्रम दोन टप्प्यात करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार पहिला कार्यक्रम १४ जून रोजी झाला तर दुसरा कार्यक्रम शुक्रवारी होत आहे.
यशवंत नाटय़ मंदिर, दादर (पश्चिम) येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार असून अभिनेत्री ईला भाटे, मुक्ता बर्वे, हेमांगी कवी तसेच अभिनेते स्वप्नील जोशी, ऋषिकेश जोशी, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आणि अन्य रंगकर्मीचा यात समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच मराठी रंगभूमीचा आत्तापर्यंतचा प्रवास संगीत आणि नाटय़स्वरूपात सादर करण्यात येणार आहे.