अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) मुंबईसह गोव्यात छापे घालून सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून अमली पदार्थ आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी करमजीतसिंह आनंद (२३) मुंबईतील उच्चभ्रू व्यक्तींना अमली पदार्थ पुरवणारा प्रमुख विक्रेता असून त्याचा सुशांत प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा दावा एनसीबीने केला.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि पथकाने करमजीतसिंगला मुंबईतून अटक के ली. महागडय़ा किंवा परदेशी कारच्या खरेदी-विक्रीआड तो अमली पदार्थ पुरवण्याचा व्यवसाय करत होता, असे सांगण्यात आले. पथकाने पवईतून अंकुश अर्नेजा (२९) या हॉटेल व्यावसायिकाला अटक केली. दादर येथून ड्वीयान अ‍ॅन्थोनी फर्नाडीस आणि अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले.

सुशांतचा नोकर दीपेश याने चौकशीदरम्यान अन्थोनीचे नाव घेतले होते. शोविकच्या सूचनेवरून वांद्रे येथील मॉन्टब्लॅक इमारतीखाली आलेल्या अ‍ॅन्थोनीकडून चरस आणि गांजा घेतल्याचे दीपेशने सांगितले होते.

वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातून ख्रीस कोस्टा या अमली पदार्थ विक्रेत्याला अटक करण्यात आली. सर्व आरोपींकडून चरस, गांजासह अन्य अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. या सर्वाचा सुशांत प्रकरणातील अमली पदार्थ पुरवठय़ाशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध आहे. अटक आरोपींपैकी करमजीतच्या ग्राहक वर्गाबाबत चौकशी सुरू आहे.