‘बाहुबली 2’ (Baahubali: The Conclusion) या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी सुद्धा या चित्रपटाची लोकप्रियता अजून कमी झालेली नाही. बाहुबलीच्या दोन्ही भागांची लोकप्रियता पाहिल्यानंतर त्यांच्या पुढच्या भागाची योजना करण्यात आली होती. यात ‘बाहुबली: द बिगनिंग’ च्या आधी काय घडले होते ते दाखवण्यात येणार आहे. मात्र, अशा लोकप्रिय चित्रपटासाठी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रदर्शनासाठी नकार दिला आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने ‘बाहुबली: बिफोर द बिगनिंग’ या चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी नकार दिला. एस एस राजमौली आणि नेटफ्लिक्स यांचा ‘बाहुबली: बिफोर द बिगनिंग’ या चित्रपटाचे ७० टक्के चित्रीकरण पुर्ण झाल्यानंतर याला नकार देण्यात आला आहे. निर्मात्यांना त्याचे चित्रीकरण न आवडल्याने असे केल्याचे सांगण्यात येत आहे. “ज्या प्रकारचा चित्रपट तयार झाला आहे. ते पाहून निर्माते खुश नाही आहेत. ७० टक्के चित्रीकरण होऊनही त्यांनी चित्रपटाला पुन्हा एकदा बनवण्यास सांगितले आहे. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून पुन्हा एकदा चित्रपट बनवला जाणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी नेटफ्लिक्सने २०० कोटी रुपये दिले आहे.” अशी माहिती एका स्त्रोताने दिली आहे.

आता निर्माते या चित्रपटाच्या पटकथेवर, संपुर्ण स्टारकास्टवर आणि त्यांची तांत्रिक टीमसुद्धा पुन्हा एकदा या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहेत. बाहुबलीच्या दोन्ही चित्रपटांवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतला आहे की याचा पुढचा भाग आणखी चांगला असला पाहिजे.

मात्र, आता हा चित्रपट येणार नसून ९ एपिसोडची सीरिज असणार आहे. बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली आणि नेटफ्लिक्स हे एकत्र येऊन याची निर्मिती करणार आहेत. यामध्ये शिवगामी देवीचा जन्म माहिष्मतीमध्ये कसा होतो? शिवगामीचा राणी होण्यापर्यंतचा संपुर्ण प्रवासा दाखवला जाणार आहे. यात शिवगामीची तरूणपणीची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची निवड करण्यात आली होती. मात्र, आता ७० टक्के चित्रीकरण झाल्यानंतर संपुर्ण चित्रीकरण पुन्हा एकदा करायला सांगितल्याने मृणाल कडे तेवढा वेळ नाही. मृणालच्या जागेवर आता पंजाबी अभिनेत्री वामीका गब्बी शिवगामीची भूमिका साकारणार आहे.