बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला. सुशांतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे अनेकांनी म्हटले. त्यानंतर सोशल मीडियावर सुशांतच्या चाहत्यांनी स्टारकिड्सवर निशाणा साधला. अशातच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘मग तुम्ही स्टार किड्सचे चित्रपट पाहायला जाऊ नका’ असे बोलताना दिसत आहे.

नुकताच करीनाने मोजो न्यूजला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला घराणेशाही आणि स्टारकिड्स यांच्याशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर करीनाने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रेक्षकच कोणाला स्टार बनवायचं हे ठरवतात. जर तुम्हाला स्टार किड्सपासून इतक्या समस्या आहेत तर मग त्यांचे चित्रपट पाहायला जाऊ नका असे करीना बोलताना दिसत आहे. या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर करीनाचा आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ बॉयकोट करण्याची मागणी केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने करीनाचा चित्रपट लालसिंग चड्ढा पाहू नका कारण तिने स्वत: सांगितले आहे असे म्हटले आहे.

आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत असणारा लालसिंग चड्ढा हा चित्रपट २०२१मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वेत चंदन करत आहेत. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावर आधारित आहे.