संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटातील नवाजुद्दीनच्या अभिनय कौशल्याची प्रेक्षक-समीक्षक वाहवा करत आहेत. पण तुम्हाला ठाऊक आहे का, बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन हा पहिली पसंत नव्हता.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी नुकतंच याबाबत खुलासा केला आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी इरफान खानचा सर्वात आधी विचार केला गेला होता असं त्याने सांगितलं. पण इरफानच्या तब्येतीमुळे दुसऱ्या अभिनेत्याचा विचार करावा लागला. ‘दिग्दर्शक अभिजीत पानसे, संजय राऊत आणि मी मिळून बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी कोणाला निवडावं याचा विचार करत होतो. आम्ही इरफानचा सर्वात आधी विचार केला. पण त्यावेळी इरफानकडेही दुसरे प्रोजेक्ट होते आणि नंतर त्याची तब्येतही खालावली,’ असं तो म्हणाला.

‘ठाकरे’ चित्रपटाची पटकथा संजय राऊत यांनीच लिहिली आहे. बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेसाठी योग्य कोणी असेल तर नवाजुद्दीन सिद्दिकी, हे नाव त्यांनीच पहिल्यांदा आम्हाला सुचवलं, असं रोहनने पुढे सांगितलं. कधी कधी बाळासाहेब हे कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी जमिनीवरही बसायचे आणि अशा दृश्यांसाठी नवाजुद्दीन हा इरफानपेक्षा उत्तम ठरेल असं राऊत यांचं मत होतं. पुढे आम्हीही त्याला होकार दिला.

नवाजुद्दीन सिद्दिकी, इरफान खान

नवाजुद्दीनप्रमाणेच अभिनेत्री अमृता रावसुद्धा मीनाताईंच्या भूमिकेसाठी पहिली पसंत नव्हती. या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री रसिका दुग्गलला विचारण्यात आलं होतं. पण नवाजुद्दीनच्या आधीच्या ‘मंटो’ या चित्रपटात रसिकाने भूमिका साकारल्याने दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्यास सुरुवात केली.

‘अमृताशी ठरवलेल्या दिवसाच्या एक दिवस आधीच तिला भेटायला गेलो. तरीही नकार न देता तिने आम्हाला वेळ दिला. ज्याप्रमाणे मीनाताई त्यांच्याकडे मदत मागायला आलेल्या व्यक्तीला कधीच नकार देत नसायच्या तसंच अमृता रावचं हे वागणं आम्हाला भावलं,’ असं रोहनने सांगितलं.

२५ जानेवारी रोजी ‘ठाकरे’ हा चित्रपट मराठी आणि हिंदीत प्रदर्शित झाला. नवाजुद्दीन आणि अमृता रावची भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या दिवसांत या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.