मारहाणप्रकरणी पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर अटक होण्याच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेणारे अभिनेते ओम पुरी यांनी आपल्यावरील आरोप हे जामीनपात्र असल्याचे कळताच पोलिसांसमोर हजर होत जामीन घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज निकाली काढला.
पुरी यांचे वकील नितीन प्रधान यांनी पोलिसांच्या मते पुरी यांच्यावर लावण्यात आलेला आरोप हा जामीनपात्र असेल तर ते पोलिसांसमोर हजर होऊन तेथूनच जामीन घेतील, असे स्पष्ट केले. तसेच अर्ज मागे घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली. न्यायालयानेही त्यांची ही विनंती मान्य करीत पुरी यांचा अर्ज निकाली काढला.
पत्नी नंदिता हिने मारहाणीची तक्रार पोलिसांत करताच फरारी असलेल्या पुरी यांनी अटकेच्या भीतीने मंगळवारी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात आल्यावर न्यायालयाने प्रकरण शनिवापर्यंत तहकूब करीत तोपर्यंत पुरी यांना अटक न करण्याचे आदेश दिले होते.