|| पंकज भोसले

कॉलेजातील प्रेमपोवाडे अलीकडच्या काळात सिनेमांनी मोठय़ा प्रमाणावर शाळांमध्ये दाखवायला सुरुवात केली; त्याला जगभरातील मुलांचे अकाली परिपक्व होणे कारणीभूत असावे. पौगंडी जीवन मांडणाऱ्या साहित्यात जगभरात आज हायस्कूलमधला रोमान्स लोकप्रिय झाला आहे. साठ -सत्तरीतल्या दशकात कॉलेजमधील (पर्यायाने वास्तवातीलही) नायक-नायिकांचे अव्यक्त आणि नजरेच्या भाषेतले हृदयसंगमाचे सोहळे आजच्या पिढीने हायस्कूलच्या फारच आरंभिक काळात बाद ठरविले आहेत. अग्रेसर भूमिकांतून घडणाऱ्या प्रेमसोहळ्यांच्या कथांद्वारे आजच्या पिढीचा आयुष्यातील या घटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उमजून येऊ शकतो. या धर्तीवर नेटफ्लिक्सच्या ‘थर्टीन रिझन्स व्हाय’ आणि ‘सेक्स एज्युकेशन’ या मालिका आपल्याकडील पालकांनी विशेष करून पाहायला हव्यात. पाल्याशी संवाददरी वाढत जाण्याची अनेक मूलभूत कारणे त्यातून आजच्या पालकांना सापडू शकतील. अमेरिकेत सध्या यंग अ‍ॅडल्ट कादंबऱ्या हायस्कूलमधील प्रेमशिक्षणाच्याच कथा सांगत आहेत. आजचा ‘ओल्ड बॉइज’ हा सिनेमा हा गाजत्या मालिकांमधून प्रचलित झालेला अमेरिकी हायस्कूल लव्हड्रामा नाही. ब्रिटनमध्ये दोन-तीन दशकांपूर्वी फक्त मुलांच्या बोर्डिग हायस्कूलमध्ये घडणाऱ्या अशक्य अशा प्रेमत्रिकोणी घटनेचा आहे. कवीमनाच्या नायक-नायिकेचा अंतर्भाव असला, तरी त्यात निर्माण होणाऱ्या गमतींची विचारसरणी दोन-तीन दशकांपूर्वीची नसून अगदीच ताजी वाटते.

‘ओल्ड बॉइज’मधील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे, आयुष्यात कधीच नायकत्व मिळू न शकण्याची पात्रता असलेल्या अ‍ॅम्बरसन (अ‍ॅलेक्स लॉथर) या शीष्यवृत्तीच्या बळावर हायस्कूलमध्ये प्रवेश मिळालेल्या मुलाची. परिस्थितीमुळे बोर्डिगमधील इतर साऱ्या मुलांमध्ये खेळ आणि आत्मविश्वासात अतिकच्चा असलेला अ‍ॅम्बरसन साऱ्यांच्या थट्टा-मस्करीचा विषय बनलेला असतो. कुणीही यावे अन् टपली मारून जावे किंवा मनाजोगती शिक्षा सांगावी आणि ती निमूटपणे ऐकावी हा अ‍ॅम्बरसनचा हायस्कूलमधला जीवनक्रम. बोर्डिगमध्ये अ‍ॅम्बरसनबरोबर उलट पाश्र्वभूमी असलेला विंचेस्टर (जोना हाऊर किंग) हा मुलगाही असतो. जन्मजात श्रीमंतीने असलेला आत्मविश्वास, खेळापासून सर्वच क्षेत्रातील आघाडी आणि विद्यार्थ्यांमध्ये लाभलेली सर्वाधिक लोकप्रियता यांच्या बळावर लक्षवेधी बनलेल्या विंचेस्टर आणि अ‍ॅम्बरसन यांची लवकरच एका कारणामुळे मैत्री होते. हायस्कूलमध्ये शिकविण्यास दाखल झालेल्या नव्या फ्रेंच शिक्षकासोबत त्याची तरुण मुलगी अ‍ॅग्नस (पॉलीन एटिआन) बोर्डिग लगतच्या घरात राहायला आल्यानंतर त्या परिसरावर पसरलेल्या संमोहनात दोघेही विरघळून जातात. बोर्डिगमधील मुलांपैकी  अ‍ॅम्बरसनशी अ‍ॅग्नसची पहिली ओळख होते. माझ्या तऱ्हेवाईक वडिलांनी चोवीस तास सेवेसाठी इकडे आणले असून आफाट एकटेपणाने मी कंटाळले असल्याचे ती अ‍ॅम्बरसनला सांगते. वर हायस्कूलमधल्या मुलांमधील सर्वात देखण्या आणि लोकप्रिय विंचेस्टरला गटविण्यास मदत करण्याचे अ‍ॅम्बरसनला सुचविते. त्यासाठी विंचेस्टरला द्यायला अ‍ॅम्बरसनसोबत व्हीएचएसवर ‘व्हिडीओ लेटर’ पाठविते.

सौंदर्य आणि श्रीमंती मुबलक असतानाही विंचेस्टर रोमान्सबाबत माठ आहे, याची अ‍ॅम्बरसनला खात्री होते. तेव्हा अ‍ॅग्नसला व्हिडीओ लेटरमधून समर्पक उत्तर लिहिण्यात आणि काव्यात्मक पत्रे पाडण्यात अ‍ॅम्बरसन सक्रिय होतो. विंचेस्टरच्या नावाने पत्रे लिहिण्याची आणि ती अ‍ॅग्नसपर्यंत पोहोचविण्याची गुप्त पोस्टमनची  कामगिरीही अ‍ॅम्बरसन साइडहीरो बनून करू लागतो. अ‍ॅम्बरसनच्या पत्र धाडसांमुळे एकदाचा अ‍ॅग्नसच्या प्रेमकहाणीला जोरदार आरंभ होतो. या पत्रधाडसाची मोहीम पकडली गेल्याने शिक्षक आणि प्राचार्य बोर्डिगमधील मुलांच्या भल्यासाठी अ‍ॅग्नस आणि तिच्या वडिलांना दुसऱ्या जागी राहण्यास जाण्याचे आदेश देतात. आपल्या गुपचूप चाललेल्या प्रेमप्रकरणाचा बभ्रा होण्याच्या भीतीने विंचेस्टर अ‍ॅग्नससोबतचा पत्रप्रेमरूपी व्यवहार संपविण्याचा निर्णय घेतो. अ‍ॅम्बरसन मात्र या प्रेमगंगेला आटू न देण्याचा विडा उचलतो. विंचेस्टरच्या नावाने तोच लिहीत असलेला प्रेम पत्रव्यवहार अधिक काव्यात्मक रूपात सुरू ठेवतो.

प्रेमप्रकरणातून होणारा इथल्या गमती-जमतींचा मारा तीव्र नाही. तरी आधी सर्वच बाबतींत मागास भासणाऱ्या अ‍ॅम्बरसनला मुलगी दिसताच फुटणारे प्रेमधुमारे आणि कवीपासून सिनेदिग्दर्शक संचारणारा त्याचा पवित्रा खास अनुभवण्यासारखा आहे. ‘एंड ऑफ द फकिंग वर्ल्ड’ या दोन वर्षांपूर्वी आफाट गाजलेल्या मालिकेमधून आपल्या कौशल्यपूर्ण अभिनयाची चुणूक दाखविणाऱ्या अ‍ॅलेक्स लॉथरने इथल्या व्यक्तिरेखेचेही सोने केले आहे.

दिग्दर्शक टोबी मॅक्डोनल्ड याचा पहिलाच सिनेमा दिग्दर्शकीय प्रयत्न ‘सिरानो द बर्जराक’ या एकोणिसाव्या शतकातील गाजलेल्या फ्रेन्च नाटकातील कथेशी साधम्र्य सांगणारा आहे. आपल्याकडच्या प्रेक्षक आणि वाचकांनाही मिलिंद बोकिलांच्या ‘शाळे’तील कथेशी समकालीन ब्रिटनमध्ये घडणारे हे प्रेमनाटय़ सहजच आवडू शकेल. हायस्कूलमध्ये प्रेमशिक्षण घेणाऱ्या अलीकडच्या पिढीतल्या सर्वासाठी त्याच्या अपारंपरिक कथारचनेमुळे विश्वासार्ह मनोरंजन खजिना आहे.