शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ कादंबरीवर आतापर्यंत त्याच नावाचे दोन चित्रपट हिंदीत येऊन गेले आहेत. तरीसुद्धा सुधीर मिश्रा यांच्यासारख्या दिग्दर्शकाला पुन्हा एकदा या कादंबरीने भुरळ घातली असून ‘और देवदास’ या नावाचा हिंदी चित्रपट त्यांनी नुकताच पूर्ण केला आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी पारोला देवदासव्यतिरिक्त आणखी एक प्रियकर आहे असे दाखविण्यात येणार आहे, असे समजते. पारो ही प्रमुख व्यक्तिरेखा रिचा चढ्ढा साकारत असून देवदासच्या भूमिकेत राहुल भट तर पारोच्या दुसऱ्या प्रियकराच्या भूमिकेत विनीतकुमार सिंग झळकणार आहेत.
हा चित्रपट म्हणजे देवदास या गाजलेल्या कादंबरीवर आधारित असला तरी खूप महत्त्वाचे बदल चित्रपटात केले आहेत. आपली पारोच्या दुसऱ्या प्रियकराची भूमिका कादंबरीत नव्हती; परंतु ती भूमिका दिग्दर्शकाने या चित्रपटात निर्माण केली आहे. पारोचा दुसरा प्रियकर आणून चित्रपटाला नवा पैलू देण्याचा नावीन्यपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे, असे ही भूमिका साकारणाऱ्या विनीतकुमार सिंगने सांगितले.
गाजलेल्या कादंबरीवर आधारित असला तरी ‘और देवदास’ हा आजच्या काळाला अनुसरून त्याच्या कथानकात महत्त्वपूर्ण बदल करून दिग्दर्शक रुपेरी पडद्यावर ‘और देवदास’ आणणार आहेत. तरीसुद्धा मूळ प्रेमकथेप्रमाणेच काही नवे पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळतील. ‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ नंतर अनुराग कश्यप यांच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अग्ली’ या चित्रपटात विनीतकुमार सिंगने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
देवदास ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारणारा राहुल भट म्हणाला की, ‘और देवदास’ हा आधुनिक काळातील देवदासचा अवतार असलेला चित्रपट ठरेल. २०१४ मध्ये घडणारे कथानक असून ८० टक्के चित्रपट चित्रित झाला आहे. ‘अग्ली’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेमुळे राहुल भटचे समीक्षकांकडून कौतुक झाले असून देवदास साकारायला मिळाला म्हणूनही त्याने आनंद व्यक्त केला आहे. चंद्रमुखी ही भूमिका अदिती राव हैदरी साकारणार आहे.