News Flash

केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल केल्याप्रकरणी एक जण अटकेत

हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केलं होतं.

केतकी चितळे

‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम अभिनेत्री केतकी चितळेला अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. सतीश पाटील असं ट्रोल करणाऱ्याचं नाव आहे. हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून केतकीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनसुद्धा सादर केलं होतं. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने हिंदी भाषेतून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिने हिंदी ही आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे असंदेखील म्हटलं होतं. यावरून केतकीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली होती. यामध्ये काहींनी अश्लील, शिवराळ आणि खालच्या स्तरातील भाषा वापरली. यामुळे संतापलेल्या केतकीने व्हिडीओ पुन्हा अपलोड करून ट्रोलर्सचा समाचार घेतला. प्रत्युत्तर दिल्यानंतरही ट्रोलिंग सुरूच असल्याने अखेर तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

याप्रकरणी सतीश पाटीलशिवाय इतरांची देखील माहिती काढण्यात येत असून त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. केतकी चितळे हिने याप्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 1:32 pm

Web Title: one person arrested in ketaki chitale troll case ssv 92
Next Stories
1 सुष्मिता- रोहमनच्या नात्यात का रे दुरावा ?
2 तुषारसोबत भांडण झाल्यानंतर एकता कपूरने थेट पोलिसांना लावला फोन
3 ‘दोस्ताना २’मध्ये पहिल्यांदाच जमणार जान्हवी-कार्तिकची जोडी
Just Now!
X