भारताप्रमाणेच अमेरिका देखील करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे त्रस्त आहे. दररोज शेकडो नव्या लोकांना करोनाची लागण होत आहे. यातच आता जॉर्ज फ्लॉइड प्रकरणामुळे अमेरिकेत आंदोलनाचा वणवा पेटला आहे. लोक करोनाची पर्वा न करता रस्त्यांवर उतरुन आंदोलनं करत आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचं मत अभिनेत्री पद्म लक्ष्मी हिने व्यक्त केलं आहे. “हजारो लोक दररोज मरतायेत आणि सत्ताधारी बंकरमध्ये लपून बसले आहेत.” अशी टीका तिने केली आहे.

पद्म लक्ष्मी अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आहे. “आमची शहरं जळत आहेत. जवळपास चार कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रतिकूल परिस्थितीत व्हाईट हाऊसमधील हा व्यक्ती मात्र बंकरमध्ये लपून बसलाय.” अशा आशयाचे ट्विट पद्मने केले आहे.

पद्म लक्ष्मी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी तिने करोनाग्रस्त वातारणाचे निमित्त साधून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. तिचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सध्या अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड प्रकरणामुळे वातावरण पेटलं आहे. या पार्श्वभूमीवर पद्म लक्ष्मीच्या या ट्विटवर काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.