‘पद्मावत’साठी प्रदर्शन पुढे ढकलणाऱ्या ‘पॅडमॅन’ची ‘अय्यारी’शी टक्कर

सेन्सॉर बोर्डाचा नियम आणि वादविवादात सापडल्यामुळे रखडत रखडत यंदा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’मुळे आता नवीन वर्षांच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘बिग बजेट’ चित्रपटांच्या तारखांमध्ये गडबड झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यावेळीही नव्या वर्षांची सुरुवात दोन मोठय़ा चित्रपटांच्या तिकीटबारीवर आमनेसामने येण्यानेच होणार होती. मात्र ‘पद्मावत’साठी हे दोन्हीही चित्रपट लांबणीवर टाकण्यात आले. परंतु, आता पुन्हा हे दोन्ही चित्रपट फेब्रुवारीत एकाच दिवशी प्रदर्शित होऊ घातले आहेत.

वारंवार होणाऱ्या या टकरीमुळे बॉलीवूडचे निर्माते आणि कलाकार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे, तर दुसरीकडे त्यातल्या त्यात ही टक्कर टाळली जावी म्हणून तारखांच्या पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. गेल्यावर्षीची सुरुवात रईस आणि काबिल या दोन मोठय़ा चित्रपटांच्या एकत्रित प्रदर्शनाने झाली होती. सुट्टीचा आठवडा असला तरी दोन मोठे चित्रपट एकत्र आल्याने साहजिकच दोघांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून आले. यावर्षीही आर. बाल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ आणि नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ हे दोन चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होते, मात्र ‘पद्मावत’ही त्याच तारखेला प्रदर्शित होणार याची कुणकुण लागल्यावर ‘अय्यारी’चे प्रदर्शन ९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले. त्याचवेळी खरे म्हणजे ‘पॅडमॅन’ हा चित्रपट ‘पद्मावत’च्या जोडीने प्रदर्शित होईल, अशी अटकळ होती. पण चित्रपट निर्मात्यांनी भन्साळींना झालेले नुकसान लक्षात घेत त्यांना निदान तिकीटबारीवर व्यवसाय करता यावा म्हणून आपला चित्रपट पुढे ढकलला. आता पुन्हा एकदा ‘पॅडमॅन’ आणि अय्यारी हे दोन चित्रपट एकाच तारखेला प्रदर्शित होणार आहेत.

‘पॅडमॅन’चे निर्माते आपल्या तारखेवर ठाम राहिले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असे सांगत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘एवीतेवी २५ जानेवारीला दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित होणार होतेच त्यावेळी आपण वाद घातला नाही, मग आताच नाराजी कशासाठी? कुठेतरी दोन्ही चित्रपटांना सहअस्तित्व मान्य करावे लागणारच,’ असे मत बाल्की यांनी व्यक्त केले आहे. या वादाच्या पाश्र्वभूमीवर ‘अय्यारी’ हा चित्रपट पुन्हा मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाले तर ‘अय्यारी’ आणखी एका चित्रपटासाठी डोकेदुखी ठरणार आहे. अनुष्का शर्माची निर्मिती आणि मुख्य भूमिका असलेला ‘परी’ २ मार्चला प्रदर्शित होतो आहे. त्याआधी २३ फेब्रुवारीला यशराज फिल्म्सचा ‘हिचकी’ आणि ‘सोनू के टिटू की स्वीटी’ असे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. असाच प्रकार संजय दत्तच्या चित्रपटाच्या बाबतीतही घडला आहे. हा चित्रपट आधी ३० मार्चला प्रदर्शित होणार होता मात्र ‘बागी २’च्या निर्मात्यांनी आपला चित्रपट त्याच तारखेला प्रदर्शित होणार असे जाहीर केल्यावर दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी आपला चित्रपट २९ जूनपर्यंत पुढे ढकलला. तर आनंद एल. राय यांनी ‘झिरो’ या चित्रपटासाठी २१ डिसेंबर तारीख निवडली होती त्याचवेळी अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे वैतागलेल्या आनंद राय यांनी बॉलीवूडमध्ये चित्रपट प्रदर्शनासाठी एक योग्य व्यवस्था असायला हवी, असे बोलून दाखवले आहे.

मल्टिप्लेक्सचे नुकसान नाही

यावर्षी हिंदी बिग बजेट चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होत आहेत. शिवाय, तितकेच चांगले मराठी चित्रपटही त्यांच्याबरोबर प्रदर्शित होणार आहेत. मात्र यामुळे मल्टिप्लेक्सच्या व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही, असे मत मल्टिप्लेक्स चित्रपटगृह संघटनेचे दीपक कुडाळे यांनी व्यक्त केले. एकपडदा चित्रपटगृहांना फटका बसतो कारण त्यांना शो कमीजास्त करावे लागतात. या आठवडय़ात आता पद्मावतची गर्दी कमी झाली असल्याने पुढच्या आठवडय़ात ‘पॅडमॅन’, ‘अय्यारी’ आणि मराठीत ‘आपला माणूस’ असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तरी तिन्ही चित्रपटांना व्यवसाय करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.