उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध अजूनच खराब झाले असल्यामुळे ‘इम्पा’ने त्यांच्या ७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पाकिस्तानी कलाकारांनी कोणत्याही हिंदी सिनेमात किंवा प्रादेशिक सिनेमात काम करु नये असा निर्णय घेण्यात आला होता. आता सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशन यांनीही पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा थिएटरवर लावला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनावरच आता प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. शिवाय शाहरुख खानचा बहुचर्चित ‘रईस’ या सिनेमालाही सध्या थिएटरची दारं बंदच आहेत.

उरी येथील हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता असे स्पष्ट झाल्यानंतर, संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. एकामागोमाग एक होणाऱ्या अशा हल्ल्यांमध्ये आपले नागरिक आणि जवान यांचा नाहक बळी जात असून पाकिस्तानाला उत्तर देण्याची गरज असल्याची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात होती. अशात ‘इम्पा’ने पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यावर बंदी घातली. इम्पाच्या या निर्णयाचे काही गटाने स्वागत केले तर काहींनकडून जोरदार विरोधही करण्यात आला.

पण आता सिनेमा ओनर असोसिएशन आणि सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन यांनीही पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे न दाखवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानी कलाकारांचे भारतात येऊन काम करण्याचे स्वप्न सध्या तरी पूर्ण होईल असं वाटत नाही. आता फवाद खान याची भूमिका असलेला ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा वेळेत प्रदर्शित होतो की नाही हे तर येणारा काळच ठरवेल.