News Flash

चित्र रंजन : युद्ध नसलेली युद्धकथा

युद्धपट ही दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांची खासियत मानली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

पलटन

युद्धपट ही दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांची खासियत मानली जाते. विशेषत: ‘बॉर्डर’ चित्रपटानंतर त्यांची ही ओळख जास्त ठळक झाली मात्र त्यानंतर आलेले त्यांचे चित्रपट हे ‘बॉर्डर’पेक्षा पुढे जाऊ शकले नाहीत. किंबहुना आपणच तयार केलेल्या युद्धपटांच्या साच्यात जे. पी. दत्ता इतके अडकले आहेत की पंधरा वर्षांचा गॅप घेऊन त्यानंतर बनवलेला ‘पलटन’ हा चित्रपटही त्या साच्यातून बाहेर येऊ शकला नाही. मुळात हा चित्रपट युद्धावर नाही. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतरचा तणाव आणि त्या पार्श्वभूमीवर सिक्किमच्या सीमारेषेजवळ चिनी सैनिक आणि भारतीय जवान यांच्यात उडालेली चकमक हा या चित्रपटाचा विषय आहे. मूळ कथा छोटीशी आहे, त्यात आपल्या त्याच ठरावीक पद्धतीने सैनिकांच्या घरचे वातावरण, त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबीयांची होणारी वाताहत मांडत जे. पी. दत्ता यांनी हा विषय मोठा केला आहे, मात्र हा चित्रपट पाहताना पुन्हा पुन्हा ‘बॉर्डर’चीच आठवण होत राहते.

१९६७ साली सिक्किम सीमारेषेजवळ नथुला पास दरम्यान चीनची घुसखोरी रोखण्यासाठी कर्नल रॉय (अर्जुन रामपाल)यांची नियुक्ती केली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली मेजर बिशन सिंग (सोनू सूद), कॅप्टन पृथ्वी सिंग डागर (गुरमीत चौधरी) आणि मेजर हरभजन सिंग (हर्षवर्धन राणे) आपापल्या पलटनसह या सीमेवर तैनात होतात. येनकेनप्रकारेण भारतीय सैनिकांचे लक्ष विचलित करून त्यांना त्रास देणारे चिनी सैनिक आणि त्यांना नेमके कशा पद्धतीने उत्तर द्यावे हे लक्षात येत नसल्याने त्यांच्या कारवायांचा अंदाज घेत आपली नीती आखणारे भारतीय सैनिक यांच्यातील कथा रंगवताना जे. पी. दत्ता यांनी त्याच ठोकळेबाज पद्धतीने आपापल्या एकेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच तार घेऊन येणारा पोस्टमन दिसतो. प्रत्येक घरात तार दिल्यानंतर मागून येणारे रडण्याचे आवाज एका क्षणी मोठमोठे होत जातात आणि आपल्यासमोर पलटनची युद्धभूमी तयार होते. दत्तांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हाही एक मोठा युद्धपट असेल, अशी अटकळ आपण बांधतो मात्र प्रत्यक्षात मूळ घटनेतही युद्ध नसल्याने चकमकीच्या पलीकडे हातात काही लागत नाही. आणि ही चकमकही प्रत्यक्ष चित्रपटात शेवटच्या काही मिनिटांमध्ये घडत असल्याने बराचसा वेळ हा व्यक्तिरेखा प्रस्थापित करण्यात आणि मग त्या पद्धतीने येणारी गाणी यात वाया गेला आहे.

‘पलटन’ पाहताना अनेक गोष्टींची उत्तरे मिळत नाहीत. अगदी सुरुवातीलाच कर्नल राय सिंग आणि त्यांची नियुक्ती करणारे मेजर जनरल सगत सिंग (जॅकी श्रॉफ) यांच्यात पूर्णपणे इंग्रजीत संवाद घडतो. याचे प्रयोजन कळत नाही. तीच गोष्ट चिनी सैनिकांची.. ते त्यांच्या भाषेत बोलतायेत याचे कौतुक करायचे की ते काय बोलतायेत हे किमान सबटायटल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले असते तर निदान त्या बडबडीला अर्थ प्राप्त झाला असता, असा मनातल्या मनात चाललेल्या संवादाला आवर कसा घालावा हेच कळत नाही. त्यामुळे पडद्यावरचे जे कळते त्यातच रस घ्यावा एवढीच भूमिका प्रेक्षकांच्या हातात असते. हर्षवर्धन राणे आणि गुरमीत चौधरीने या दोन अभिनेत्यांना मेजर हरभजन आणि गुरमीत चौधरीच्या भूमिकेत केवळ त्यांचे शरीरसौष्ठव दाखवण्यासाठीच घेतले असावे, अशी शंकाही मनाला चाटून जाते. युद्ध नाही पण तशी परिस्थिती निर्माण होणार हे लक्षात आल्यानंतर त्यांचे घरच्यांशी होणारे संवाद, एकाच वेळी सैनिक आणि त्यांच्या नेतृत्वाने शेवटच्या क्षणी आपापल्या सुहृदांची छायाचित्रे पाहणे अशा अनेक गोष्टी विनाकारण चित्रपटात आहेत. त्याऐवजी सीमेवर तैनात असलेल्या या सैनिकांची आणि त्यांच्या नेतृत्वाची रणनीती, बदलत गेलेले निर्णय यावर प्रकाश टाक ला असता तर हा चित्रपट नक्कीच वेगळा ठरला असता. हायकमांडचा आदेश वेळेत न मिळाल्याने सैनिक  शहीद होतात, या संदर्भासह अनेक गोष्टींसाठी ‘पलटन’ पाहताना ‘बॉर्डर’चीच आठवण येते आणि मग तोच बरा होता ही एकच भावना घर करते.

* दिग्दर्शक – जे. पी. दत्ता

* कलाकार – जॅकी श्रॉफ, सोनू सूद, अर्जुन रामपाल, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे, लव सिन्हा, सिद्धांत कपूर, रोहित रॉय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 4:29 am

Web Title: paltan hindi movie review
Next Stories
1 बॉलिवूडच्या राणीचा असाही थाट
2 एलजीबीटी समुदायाला पाठिंबा देणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात
3 …म्हणून ऋषी कपूर- माधुरीने बुरखा घालून केला ‘तो’ प्रवास
Just Now!
X