सध्याची तरुण पिढीच नाही, तर बच्चेकंपनीसुद्धा मोबाइल, इंटरनेट यांच्या आहारी गेल्याचे चित्र घराघरात दिसून येते. एकीकडे इंटरनेटमुळे मुलांचे अभ्यासाकडे आणि खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्रस्त असलेल्या पालकांना मुलांना या माध्यमापासून दूर कसे ठेवायचे हा प्रश्न सतत भेडसावत असतो. हीच बाब लक्षात घेऊन, मुलांना इंटरनेटची भीती दाखवण्यापेक्षा त्यांच्या इंटरनेट वापरावर पालकांनी लक्ष ठेवणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला, खुद्द अमिताभ बच्चन यांनी पालकांना दिला आहे.

इंटरनेटचे खुले माध्यम सध्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आकर्षित करत आहे. विशेषत: मुलांसाठी तर हा जादूचा पेटारा आहे. विविध गेम्सपासून ते सोशल नेटवर्किंग साइट्स वापरण्यासाठी मुलांकडून इंटरनेटचा सर्रास वापर केला जातो. आईवडील आपापल्या कामामध्ये गुंतलेले असताना घरातील एकलकोंडय़ा मुलांसाठी इंटरनेटचे माध्यम मात्र विरंगुळ्याचे काम करते. हीच बाब लक्षात घेत ‘वर्ल्डू.कॉम’ या मुलांसाठी बनवलेल्या वेबसाइटच्या प्रसिद्धीसाठी आले असता अमिताभ बच्चन यांनी, आजच्या पिढीतील मुलांना टेडी बिअरपेक्षा टॅबलेट जवळचा वाटू लागलाय हे वास्तव आहे आणि आजच्या पालकांनी हे स्वीकारायची गरज असल्याचे सांगितले. ज्याप्रमाणे शाळा आणि शाळेतील शिक्षण मुलांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते, तसेच भविष्यातील तरुण पिढी घडवण्यासाठी इंटरनेटची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगताना, आज काळासोबत अधिकच पुढारलेले इंटरनेट संवादाचे आणि माहितीचे उत्तम माध्यम बनले आहे. त्यामुळे इंटरनेटपासून मुलांना दूर ठेवण्यापेक्षा त्यांच्या इंटरनेट वापरावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे, अमिताभ बच्चन यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांचे मुलांवरील विशेष प्रेम कित्येकदा दिसून आले आहे. सध्या कुठल्याही समारंभामध्ये त्यांच्या गप्पांचा शेवट आराध्याचा विषय निघाल्याशिवाय पूर्ण होतच नाही. नुकतेच कोलकात्याला एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी बोलताना लहानपणाचा काळ प्रत्येक व्यक्तीचा सर्वात सुखाचा काळ असतो, त्या वेळी तुम्ही मुक्त असता, कोणत्याही जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर नसतात. त्यामुळे आजही वयाच्या ७३व्या वर्षी आपल्याला पुन्हा एकदा लहान मुलं बनायची संधी मिळाल्यास नक्कीच आवडेल, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे याच मुलांसाठी एकत्रित प्रयत्न करून एक उत्तम इंटरनेटस्नेही भविष्य बनवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यानिमित्ताने बोलून दाखवली.