News Flash

चित्र रंजन : भानावर आणणारी गोष्ट

गुणवत्ता नसताना एखाद्याला मिळणारे यश चक्रावून टाकणारे असते, मात्र गुणवत्ता असून अचानकपणे मिळालेले यशही तितकेच धोकादायक ठरू शकते

(संग्रहित छायाचित्र)

परी हूँ मैं

गुणवत्ता नसताना एखाद्याला मिळणारे यश चक्रावून टाकणारे असते, मात्र गुणवत्ता असून अचानकपणे मिळालेले यशही तितकेच धोकादायक ठरू शकते. निदान आजच्या धावपळीच्या युगात तरी हेच सत्य आहे. ससा आणि कासवाच्या शर्यतीत सातत्याने पुढे जाणारे कासवच जिंकते, हे कितीही रटले तरी एकदा ससा पुढे आला आहे म्हटल्यावर तो पुढे जाणारच या विश्वासाने आपण पळत असतो किंवा ज्याला यश मिळाले आहे त्याला त्यामागे पळवत असतो. हल्ली अनेकदा हा पळणारा ससा म्हणजे आपली मुले आणि पळवणारे आपण आईवडील हे चित्र अभ्यासापासून खेळ, ग्लॅमर सगळ्याच क्षेत्रांत पाहायला मिळते. मग एखादीच ठोकर लागते आणि या सुसाट पळणाऱ्या गाडीची उलटापालट होईस्तोवर आपण भानावर येत नाही. रोहित शिलवंत दिग्दर्शित ‘परी हूँ मैं’ हा नेमक्या क्षणी आलेला आणि मुलांच्या बाबतीत आपण कुठल्या पद्धतीने वागतो आहोत याचे भान आणून देणारा चित्रपट आहे.

‘परी हूँ मैं’ हा चित्रपट इरावती कर्णिक लिखित ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेवर आधारित आहे. गेली काही वर्षे सातत्याने ग्लॅमरच्या जगात वावरणाऱ्या लहान मुलांबद्दल बोलले जात आहे. काळवेळेच्या कुठल्याही गणितात न बसवता कधी अभिनय, कधी नृत्याच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तर मालिका-चित्रपटांत काम करण्यासाठी म्हणून अनेक लहान मुले राबत असतात. त्यांची आवड जपण्यासाठी म्हणून केलेला आग्रही प्रयत्न यश मिळताक्षणी नकळतपणे कधी अट्टहासात बदलत जातो हे आईवडिलांच्याही लक्षात येत नाही. हीच प्रक्रिया नेमकी मुलांसाठीही तितकीच गुंतागुंतीची असते हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रोहित शिलवंत याने साजिरीच्या गोष्टीतून केला आहे. साजिरी दिघे (श्रुती निगडे), तिची आई (देविका दफ्तरदार) आणि तिचे बाबा (नंदू माधव) या त्रिकोणी प्रेमळ कुटुंबाची ही गोष्ट. चाळीत राहणारे हे कुटुंब आर्थिकदृष्टय़ा सधन नसले तरी खाऊनपिऊन सुखी-समाधानी असे आहे. साजिरी हुशार, दिसायलाही सुंदर, शाळेत अभ्यासापासून नाटकापर्यंत सगळ्यात पुढे.. त्यामुळे कोणाच्याही नजरेत चटकन भरेल अशी. याच जोरावर एका मालिकेसाठी साजिरीला ‘ऑडिशन’साठी बोलावले जाते. तिची निवडही होते. मालिका सुरू झाल्यानंतर आणि लोकप्रिय झाल्यानंतर साजिरीचे जग वेगाने बदलते. त्याहीपेक्षा तिच्या वडिलांचे जग बदललेले असते. चाळीतून दिघे कुटुंब आलिशान टॉवरमध्ये येते. गाडीनेच सगळीकडे प्रवास सुरू होतो. एखाद्या ‘स्टार’सारखे ग्लॅमरस आयुष्य साजिरी जगू लागते. आणि एक दिवस अचानक मालिका बंद पडते. अचानकपणे तिच्या आयुष्यात हा ग्लॅमरस अध्याय सुरू झालेला असल्याने तो बंद पडतो म्हणजे नेमके काय होते आहे हे त्या लहान मनाला उमगत नाही. त्यानंतर होत गेलेले नकारार्थी बदल तिच्या पचनी पडत नाहीत आणि मग ही छोटी परी कोमेजून जाते, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे.

मुळातच लहान मुलांनी रिअ‍ॅलिटी शो- मालिका यात काम करावे की नाही, यावरून मतभेद आहेत. मुलांनी लहान वयात कामच करू नये, असाही सूर आहे आणि त्यांना लहान वयात त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळत असेल तर त्यांनी काम का करू नये, असा सवालही केला जातो. या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात न अडकता कथेतून या विषयावर बोट ठेवताना दिग्दर्शकाने कमालीच्या सहजपणे आणि वास्तवाचे भान राखत आईवडील आणि मुले यांच्या मानसिक-भावनिक बदलाची गोष्ट रेखाटली आहे. साजिरीला मिळालेल्या यशामुळे आपली आर्थिक परिस्थिती बदलते आहे हे लक्षात आल्यानंतर तिचे वडील त्यात वाहवत जातात. साजिरीला ते करण्यात रस आहे की नाही, तिची कुवत आहे की नाही आणि तिला पुढे जायचे असेल तर तिची तयारीही करून घ्यायला हवी, अशा अनेक गोष्टींकडे ते कानाडोळा करतात. यातूनच एका क्षणी या तिघांचाही आपापसांतील संवाद तुटतो आणि मग अपयशानंतर आलेली परिस्थिती बदलण्यासाठी आपले कुठे चुकले, याचा शोध सुरू होतो. कुठेही भडक नाटय़ न आणता अतिशय सहजपणे, ओघवत्या शैलीत दिग्दर्शकाने या चित्रपटाची मांडणी केली असल्याने हा विषय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो म्हणण्यापेक्षा थेट काळजाला भिडतो. उत्तम कथेसाठी नंदू माधव, देविका दफ्तरदारसारख्या अप्रतिम कलाकारांची निवड करीत दिग्दर्शकाने ही बाजीही जिंकली आहे. हिंदी अभिनेत्री म्हणून समोर येणाऱ्या फ्लोरा सैनी यांनीही त्यांच्या सहज अभिनयाने सुखद धक्का दिला आहे. तर परीच्या भूमिकेत श्रुती निगडेने अफलातून काम केले आहे. चित्रपटात येणारी तिन्ही गाणी कथेचा संदर्भ जोडून घेत येतात. उत्तम कथा, उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय, उत्तम संवाद, उत्तम गीते आणि संगीत अशा सगळ्या बाजूंनी जमलेला ‘परी हूँ मैं’ हा चित्रपट सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे.

* दिग्दर्शक – रोहित शिलवंत

* कलाकार – नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी, मंगेश देसाई.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 4:31 am

Web Title: pari hoon main marathi movie review
Next Stories
1 चित्र रंजन : युद्ध नसलेली युद्धकथा
2 बॉलिवूडच्या राणीचा असाही थाट
3 एलजीबीटी समुदायाला पाठिंबा देणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात
Just Now!
X