सुहास जोशी

वेब सीरिज हा मनोरंजनाचा प्रकार आपल्याकडे रुजायला लागला त्याला दोनएक वर्षे झाली. पण भारतीय वेबसीरिजकर्त्यांचा ठोकळेबाजपणा कमी होण्याचे काही चिन्ह नाही. रेल्वे स्थानकांवरील पुस्तकांच्या दुकानांमध्ये हिंदी कादंबऱ्याचा एक साचा असतो, ज्यामध्ये एखादा गुप्तहेर किंवा पोलीस अधिकऱ्याने उलगडलेले आंतरराष्ट्रीय कारस्थान, त्यात एखादी नायिका, खलनायकाची प्रेयसी वगैरे वगैरे असं बरंच काही साचेबद्ध मालमसाला असतो. साधारण त्याच धर्तीवर आपल्या वेबसीरिज बेतलेल्या असतात. सेक्स आणि क्राईम या दोन बाबींभोवतीच वेबसीरिज फिरताना दिसतात. तशा त्या असायला काहीच हरकत नाही, पण या दोन घटकांबरोबर निर्मितीवर कसलीही मेहनत घेण्याचे कष्टच घेतले जात नाहीत. त्यामुळे त्या केवळ रटाळच नाही तर बाळबोधदेखील ठरतात. झी ५ वरील ‘फिक्सर’ आणि ‘पॉयझन’ या दोन्ही मालिका हे वर्णन सार्थ ठरवतात.

फिक्सर ही मालिका निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या कारनाम्यावर बेतलेली आहे. निलंबनानंतर हा अधिकारी वेगवेगळ्या सेटलमेन्ट करण्याचे काम सुरू करतो. एका कामातून दुसरे काम, त्यातून पुन्हा तिसरे काम अशी एकापाठोपाठ एक मालिका सुरू होते. आणि त्याच नादात तो भलत्याच गोष्टीत अडकतो. तर पॉयझन ही सीरिज नेमकी एकाच व्यक्तीची गोष्ट सांगत नाही. तुरुंगातून सुटून आलेला नायक मालिकेच्या पहिल्याच दृश्यात एकाचा खून करतो. पाठोपाठ वडिलोपार्जित घर विकतो आणि गोव्यात जाऊन राहतो. गोव्याच्या गुन्हेगारी विश्वात शिरकाव करण्याचा त्याचा प्रयत्न, स्थानिक दादा लोकांशी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी पंगा घेऊ  लागतो.

या दोन्ही मालिकांच्या कथानकात कसलाही दम नाही. वेबसीरिजच्या नावाखाली केवळ एक टिपिकल साचेबद्ध गोष्ट खपवणे इतकाच हेतू दिसून येतो. दोन्ही मालिकांमध्ये बाळबोधपणा अगदी ठासून भरला आहे. पोलीस ही यंत्रणा एकदम दूधखुळी आहे की काय असे वाटावे असे चित्रण या दोन्ही मालिकांमध्ये आहे. कोणतीही बाब एका मिनिटात फिक्स करता येते असेच फिक्सर मालिका पाहताना वाटू लागते. आणि यातील कलाकारदेखील याच पद्धतीने धडाधड फिक्सिंग करताना दिसतो. कसलाही धरबंद नसल्याप्रमाणे या गोष्टी घडत असतात. एकूणच मालिका संपताना हाती काहीच लागत नाही.

या दोन्ही मालिका म्हणजे योगायोग आणि चमत्कारांच्या खाणी आहेत. मालिकेतले सर्वच्या सर्व प्रसंग केवळ कर्मधर्मसंयोगानेच घडतात की काय अशा पद्धतीने मांडले आहेत. ना त्यामध्ये रहस्य आहे, ना थरार. नायक येतो आणि पाच मिनिटात सर्व काही गुंता सोडवून पुढच्या मोहिमेवर जातो. असाच सारा मामला. त्याच वेळी इतर सर्व कलाकार मात्र केवळ विनोदी पात्रांचीच भूमिका बजावण्याठी मालिकेत आलेली आहेत की काय असेच वाटू लागते. पॉयझन मालिकेतील पोलीस निरीक्षक आणि त्याचे साथीदार म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ असावा असेच दाखवले आहेत. तीच बाब फिक्सरमधील धनदांडग्या चित्रपट निर्मात्याची. एकूणच काय तर सगळा सावळागोंधळ.

दोन्ही मालिकांमध्ये एक बाब अगदी सामाईक आहे ती म्हणजे कसलाही आगापिछा नसताना येणारी सेक्स दृश्य. इंटरनेटवरील मनोरंजनावर सेन्सॉरचे बंधन नाही यामुळेच केवळ सेक्स दृश्यांचा समावेश करायचा असाच सध्या आपल्याकडे खाक्या आहे. असं काही सीरिजमध्ये असले की सीरिज अनेकजण पाहतात हा आपल्याकडच्या वेबसीरिज निर्मात्यांनी करून घेतलेला गोड गैरसमज आहे. जितक्या लवकर हा गैरसमज दूर होईल तेवढे नवीन काही तरी डोक्याला चालना देऊन मांडता येईल. अन्यथा त्याच त्याच साचेबद्ध कादंबऱ्याप्रमाणे हिंदी वेबसीरिजचा गाडा सुरू राहील. रेल्वे स्थानकावरील कादंबऱ्यांचे आयुष्य रेल्वे प्रवासापुरतेच असते, तसेच त्यामुळे तशा वेबसीरिजचे आयुष्यदेखील तेवढेच राहील.

‘फिक्सर’ – ‘पॉयझन’

ऑनलाइन अप – झी ५