करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला एका अतिउत्साही व्यक्तीने चांगलाच प्रतिसाद दिला. त्याने आपल्या संपूर्ण अंगावर मेणबत्त्या पेटवल्या. या व्यक्तीचा व्हिडीओ अभिनेत्री पूजा बेदी हिने ट्विट केला आहे.

“या व्यक्तीचा मेणबत्ती पुरस्कार देऊन गौरव करायला हवा.” अशा आशयाची गंमतीदार पोस्ट लिहून पूजाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अभिनेत्री पूजा बेदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती बिनधास्तपणे आपलं मत व्यक्त करताना दिसते. या पार्श्वभूमीवर पूजाने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

“करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं. “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्कमतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, ” असं भावनिक आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं. आपण सर्वांनी एकत्र येऊन या करोनाच्या अंध:काराला पळवून लावूयात असं सांगत मोदींनी आपलं भाषण संपवलं.