दिग्दर्शक व नायक अशी जोडी जमत अनेक चित्रपट उत्तम जमले याची उदाहरणे अनेक. विजय आनंद-देव आनंद अथवा शक्ती सामंता-राजेश खन्ना अशी आणखीन काही नावे सांगता येतील. दिग्दर्शक-नायिका अशीही जोडी जमते आणि उत्तम कलाकृती आकाराला येतात असेही घडते. रामगोपाल वर्मा-उर्मिला मातोंडकर हे उदाहरण सर्वज्ञात आहे. पण दिग्दर्शक-नायक आणि नायिका अशा तिघांचीही जोडी अनेक चित्रपटांसाठी एकत्र आल्याची उदाहरणे तशी कमीच. डेव्हिड धवन-गोविंदा आणि करिश्मा कपूर हे एक मसालेदार मनोरंजक चित्रपटाचे उदाहरण आहे.

प्रमोद चक्रवर्ती, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हा सत्तरच्या दशकातील यशस्वी त्रिकोण. प्रमोद चक्रवर्ती हे चित्रपटसृष्टीत चक्कीदा म्हणून ओळखले जात. ट्वेल ओ क्लॉक (१९५८) ते ‘बारुद’ (१९९८) या चाळीस वर्षांच्या दिग्दर्शन कारकिर्दीत त्यानी अठरा चित्रपट दिले . या काळात त्यांनी बदलता काळ, बदलता चित्रपट व बदलता प्रेक्षक अनुभवलाय. अगदी धर्मेंद्र-हेमा जोडीच्या चित्रपटातही त्यानी हा बदल स्वीकारला. त्यांच्या ‘जुगनू’चा (१९७३) नायक आदर्शवादी होता. ‘नया जमाना आयेगा…’ हे हेमावरचे गाणे पुरेसे बोलके ठरावे. तर तोपर्यंत धर्मेंद्र प्रामुख्याने सोबरच भूमिका करे. (अपवाद ओ. पी. रल्हनचा ‘फूल और पत्थर ‘) तोच धर्मेंद्र चक्कीदांच्या ‘जुगनू’मध्ये (१९७३) साहसी हिरो होता. हेलिकॉप्टरमधून तो हेमाला उद्देशून गायला, ‘प्यार के इस खेल मे…’ याच काळात धर्मेंद्र व हेमा जवळ येण्याची प्रक्रिया सुरु झाली असे गॉसिप्स रंगले. हे दोन्ही चित्रपट सुपर हिट असल्यानेच हेमाची आई जया चक्रवर्ती निर्माती झाल्यावर प्रमोद चक्रवर्तीच दिग्दर्शक असणार हे स्वाभाविकच. आणि चित्रपटाचे नाव काय तर हेमा मालिनीची प्रतिमा ओळख. अर्थात ‘ड्रीम गर्ल’ (१९७७) एव्हाना धर्मेंद्र-हेमा अन्य निर्माता-दिग्दर्शकांच्याही चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत होतेच. (शराफत, शोले, प्रतिज्ञा इत्यादी) ही जोडी चक्कीदांच्या ‘आझाद’मध्ये (१९७८) पुन्हा एकत्र आली. हे छायाचित्र याच चित्रपटाच्या सेटवरचे आहे.

एकाच दिग्दर्शकाशी जोडीचा सूर जमल्याने सेटवरचे वातावरण सुरळीत राहते. एकमेकांच्या काम आणि स्वभावाची बरीच ओळख असते. विशेष म्हणजे, चक्कीदानी ऋषि कपूर व शोमा आनंद यांच्या ‘बारूद’मध्ये (१९७४) या जोडीला पाहुणे कलाकार म्हणून दाखवले. (१९९८ चा अक्षयकुमार व रविनाचा ‘बारुद’ याच चित्रपटाचा नावासह रिमेक होता.) आणखीन एक विशेष म्हणजे, चक्कीदांच्या ‘ज्योती’मध्ये हेमा शीर्षक भूमिकेत होती (नायक जीतेन्द्र), तर त्यांच्याच ‘नास्तिक’मध्ये हेमा अमिताभची नायिका होती. पण गंमत म्हणजे चक्कीदांच्या चित्रपटात धरम-हेमा जोडी पाह्यची अशी आवड आणि सवय असणार्‍या प्रेक्षकांनी हे दोन्ही चित्रपट नाकारले. तसा चक्कीदांचा ‘जागीर’मध्ये धर्मेंद्र नायक होता तरी नायिका झीनत अमान असल्याने तोही फ्लॉप.

दिग्दर्शक, नायक आणि नायिका अशा त्रिकोणाची प्रेक्षकही नकळत सवय लावून घेतात म्हणायचे. तिघांची झक्कास केमिस्ट्री पडदाभर दिसते ना?
दिलीप ठाकूर