करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यापासून सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या काळात अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. यात चित्रपटसृष्टीचादेखील समावेश होता. मात्र, अनलॉकच्या टप्प्यात प्रत्येक क्षेत्रातील कामकाज हळूहळू सुरु होताना दिसत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीदेखील बहरु लागली आहे. यामध्येच आता अनेक मालिका, चित्रपटांचं चित्रीकरण सुरु झालं आहे. विशेष म्हणजे लवकरच अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच भव्य रांगोळीच्या माध्यमातून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

पुण्यातील तळजाईमाता मंदिराबाहेर सरसेनापती हंबीरराव या आगामी ऐतिहासिक चित्रपटाचं रांगोळीच्या माध्यमातून पोस्टर साकारण्यात आलं. या रांगोळीवर ‘कोरोनासुराचा वध करण्यासाठी दार उघड बये… दार उघड… असं लिहिण्यात आलं आहे. ही रांगोळी मयूर दुधाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील काही महिन्यांपासून समाजात काही प्रमाणात नैराश्याचे वातावरण पसरले आहे. दिवाळीमध्ये समाजात सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी ‘करोना’ रूपी राक्षसाचा वध करण्याचे साकडे या रांगोळीच्या माध्यमातून देवीला घालण्यात आलं आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची ही भव्य रांगोळी काढण्यासाठी आम्हाला १३ तास लागले. आम्ही सकाळी ७ वाजता रांगोळी काढायला सुरवात केली व रात्री ८ वाजता ती पूर्ण झाली. १० सहकाऱ्यांनी ही रांगोळी काढण्यासाठी मदत केली. यासाठी सुमारे ९० किलो रांगोळी लागली, या रांगोळी पोस्टरचा आकार २० बाय २५ फूट आहे, असं मयूर दुधाळ म्हणाले.

दरम्यान, ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे. तर संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट जून २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.