News Flash

झी टॉकीजवर ‘केसरी’चा प्रीमिअर

करोनाच्या या कठीण काळातसुद्धा प्रेक्षकांना भरभरून मनोरंजन देण्याचा विडा ‘झी टॉकीज’ने उचलला आहे.

करोनाच्या या कठीण काळातसुद्धा प्रेक्षकांना भरभरून मनोरंजन देण्याचा विडा ‘झी टॉकीज’ने उचलला आहे. प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करण्याच्या उद्देशाने नवनवीन चित्रपट घेऊन येणाऱ्या झी टॉकीज वाहिनीवर सुजय डहाके  दिग्दर्शित ‘केसरी’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. रविवारी, ३० मे रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही कुस्ती खेळली जाते. तेथील घराघरात एक तरी गडी हा पैलवान असतो आणि एकदा तरी ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकण्याचे स्वप्न पैलवान उराशी बाळगून असतो. कुस्तीच्या या खेळाची आणि ते खेळणाऱ्या कुस्तीवीरांची कथा – व्यथा मांडणारा हा चित्रपट आहे. आखाड्यात उतरून भल्याभल्यांना चीतपट करण्याचे स्वप्न या चित्रपटातील नायक म्हणजेच बलराम जाधव पाहतो आहे. बलरामचे वडील गवळी, घरची परिस्थिती अगदी बेताची. तरीही बलराम आजोबांच्या मदतीने पैलवान होण्यासाठी धडपड करतो. मात्र बलरामच्या वडिलांना हे मान्य नाही. अखेर एका क्षणी पैलवान होण्याचे स्वप्न मनाशी घेऊन बलरामला घर सोडावे लागते आणि इथून पुढे त्याचा शोध सुरू होतो. आखाड्यात उतरण्यासाठी लागणारा खुराक कुठून आणायचा इथपासून ते तालीम देणारा गुरू कोण? असे अनेक प्रश्न समोर असलेला बलराम ‘महाराष्ट्र केसरी’ बनणार का? त्याचा प्रवास किती खडतर असणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘के सरी’ या चित्रपटातून उलगडतील.

 

भाऊसाहेब शिंदेचा ‘रौंदळ’

‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पदार्पणातच ‘ख्वाडा’सारख्या बहुचर्चित चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर ‘बबन’ चित्रपटातील भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या भाऊसाहेब शिंदेने ‘रौंदळ’ या आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे.  या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते बाळासाहेब शिंदे यांच्या साथीने पहिल्यांदाच भाऊसाहेब सहनिर्मात्याची जबाबदारीही पेलणार आहे. ‘रौंदळ’चे पोस्टर प्रकाशित करण्यात आले असून यात एक रांगडा गडी पाहायला मिळतो. धडाकेबाज अ‍ॅक्शन आणि एका वेगळ्या भूमिके तून भाऊसाहेब पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. गजानन पडोळ हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पदार्पणातच सर्वांचं लक्ष वेधून घेतलेल्या भाऊसाहेबने महाराष्ट्राच्या लाल मातीतील अस्सल नायक साकारत देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये जाणकारांकडून दाद मिळवली आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना भाऊसाहेबने स्वत:च्या हिमतीवर मिळवलेलं हे यश आणि खेडेगाव ते चंदेरी दुनियेपर्यंतचा प्रवास कोणत्याही नवोदित कलाकारासाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे. मनात आवड असेल तर कोणतंही काम कठीण नसल्याचं सिद्ध करणारा भाऊसाहेब ‘रौंदळ’मध्ये पुन्हा काही तरी दणकेबाज करणार यात शंका नाही. लवकरच ‘रौंदळ’च्या चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:14 am

Web Title: premiere zee talkies kesari akp 94
Next Stories
1 ‘फ्रेंड्स’ची पुनर्भेट
2 भाषेपल्याडचं मनोरंजन
3 जगणं सोप्या भाषेत उलगडणारी दिठी
Just Now!
X