ब्रिटनच्या राजघराण्यात सध्या लग्नाचे वारे वाहात असून, लवकरच प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल विवाहबद्ध होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांनीही त्यांचे नाते सर्वांसमोर उघड करत आपला साखरपुडा झाल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासूनच हॅरी आणि मेगनच्या नात्याने अनेकांचेच लक्ष वेधले. राजघराण्याची सदस्य होण्यासाठी मेगन फारच उत्सुक असून, ती सध्या या कुटुंबाच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या शिष्टाचाराचेही पालन करत आहे. मेगनने प्रिन्सची पत्नी म्हणून राजघराण्यात प्रवेश करण्यापूर्वी तिचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट बंद केले आहेत.

‘द स्टार ऑनलाइन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मेगनने तिचे फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील अकाऊंट डिलीट केले आहेत. याविषयी राजघराण्यातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकाच्या माध्यमातून तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. ‘सोशल मीडियावर दिलेल्या प्रेमासाठी मेगन तुमची आभारी आहे’, असे म्हणत तिने सोशल मीडियावरुन काढता पाय घेतल्याची माहिती सर्वांना देण्यात आली. गेल्या बऱ्याच काळापासून तिचे हे अकाऊंट सक्रीय नव्हते. असे असले तरीही ‘केंसिंग्टन पॅलेस’च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या आणि प्रिन्स हॅरीच्या लग्नाविषयीची आणि ब्रिटनच्या राजघराण्याविषयीची माहिती देण्यात येईल असे पॅलेसतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

मेगन आणि प्रिन्स हॅरी १९ मे रोजी ‘विंडसर कॅसल’ येथे एकमेकांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचे वचन देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या काळात बहुचर्चित विवाहसोहळ्यांमध्ये मेगन आणि प्रिन्स हॅरीच्या लग्नाचीच सर्वाधिक चर्चा होत असल्याचे चित्र आहे.