सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला त्रास देण्याची घटना घडल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनाही या त्रासापासून दूर राहता आलं नाहीये. पंजाबी चित्रपटांमधून आणि पंजाबी गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या अभिनेता दिलजित दोसांजलाही अशाच एका प्रसंगाचा सामना करावा लागला होता. ‘उडता पंजाब’ या चित्रपटापासून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत दिलजितने स्वत:चाही प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. त्याच्याभोवती नेहमीच चाहत्यांची गर्दी असते. सोशल मीडियावरही दिलजित चांगलाच गाजतोय. पण, पंजाबी सेन्सेशन असलेल्या या अभिनेत्याला त्याच्या काही चाहत्यांमुळेच एका विचित्र प्रसंगाचा सामन करावा लागला होता.

‘प्लॅनेट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत दिलजितने या प्रसंगाविषयी सांगितलं. एका कार्यक्रमात चाहत्यांसोबत संवाद साधत असतानाच दिलजितच्या पाठीमागे उभ्या असणाऱ्या घोळक्यातील एका मुलीने त्याला चिमटा काढल्याचं त्याने या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं. चाहत्यांच्या या अशा विचित्र वागण्यामुळे दिलजितलाही काही कळेनासं झालं होतं. त्या गोष्टीची वाच्यता त्याने कुठेच केली नव्हती. दरम्यान, या मुलाखतीत त्याच्यासोबत अभिनेत्री सोनम बाजवासुद्धा उपस्थित होती. या पंजाबी सुपरस्टारचा हा अमुभव ऐकून सोनमच्या भुवयाही उंचावल्या.

सहसा अभिनेत्रींना या अशा प्रसंगांना सामोरं जावं लागल्याच्या घटना आजवर पाहायला मिळाल्या आहेत. पण, एखाद्या अभिनेत्याला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागण्याची बाब अनेकांनाच विचार करायला भाग पाडत आहे. कलाविश्व, कलाकार आणि चाहते यांच्यामध्ये असणारी दरी आता बऱ्यापैकी कमी झाली असली तरीही प्रत्येकाने आपल्या मर्यादा राखून वागलं पाहिजे ही गरज आता प्रकर्षाने जाणवत आहे.

वाचा : नागिण, सास आणि बकवास…. या ५ मालिका कधी बंद होणार

सध्या, हा पंजाबी सुपरस्टार त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे.  ‘बालाजी मोशन पिक्चर्स’च्या बॅनरअंतर्गत साकारण्यात आलेल्या ‘सुपरसिंग’ चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनम बाजवा आणि दिलजित दोसांज ही जोडी पुन्हा एकत्र झळकणार आहे.