‘रॅम्बो’ म्हणजेच हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलॉन आणि बॉलिवूडमधील दबंग अभिनेता सलमान खान या दोघांच्याही मैत्रीचा नेहमीच अनेकांना हेवा वाटतो. मुळात सिल्वेस्टर यांना भारतीय प्रेक्षकांकडूनही पसंती मिळत असल्यामुळे आणि सलमानसोबतच्या मैत्रीमुळे चाहत्यांच्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळं स्थान आहे. याच मैत्रीखातर दोन्ही कलाकार एकमेकांना शक्य त्या वेळी मदतही करतात. याचा प्रत्यय नुकताच आला.

सलमानच्या आगामी ‘रेस ३’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी म्हणून स्टॅलॉन यांनी सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित एक फोटो पोस्ट केला. पण, हे फोटो पोस्ट करणं त्यांना महागात पडल्याचं पाहायला मिळालं. सलमानला त्याच्या ‘रेस ३’ या चित्रपटासाठी शुभेच्छा देत स्टॅलॉन यांनी त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलचा न चुकता उल्लेख केला. पण, या पोस्टमध्ये त्यांनी बॉबी देओलचा फोटो वापरला.

त्यांची ही चूक नेटकऱ्यांनी अचूकपणे हेरत सोशल मीडियावर स्टॅलॉन यांची जोरदार खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही सलमानचा नव्हे, तर बॉबी देओलचा फोटो पोस्ट केल्याचं अनेकांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं. चूक लक्षात आल्यानंतर सिल्वेस्टर यांनी तो फोटो डिलीट केला.

ब्रिटनच्या राजकुमाराची शाही लग्नपत्रिका पाहिलीत का?

दरम्यान, सध्या सलमान सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत ‘रेस ३’ या चित्रपटाची प्रसिद्धी करताना दिसत आहे. या चित्रपटातून कोणकोणतचे कलाकार झळकणार आहेत, हे आतापर्यंत सर्वांसमोर उघड करण्यात आलं असून चाहत्यांमध्ये भाईजानची ही ‘रेस’ पाहण्यासाठी उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा आता बॉक्स ऑफिसवर ‘रेस ३’ला किती यश मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.