राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले वैविध्यपूर्ण नाटय़प्रयोग पाहण्याची संधी पुणेकर नाटय़प्रेमींना मिळणार आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे २६ ते ३१ जानेवारी दरम्यान रंगमहोत्सव २०१८ या नाटय़महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या नाटय़प्रयोगांतून हिंदी-उर्दू भाषा, विविध संस्कृतीचा समृद्ध करणारा अनुभव घेता येणार आहे.

पुण्यातील नाटय़संस्कृतीला बळ देण्याचं काम महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेनं केलं आहे. सुदर्शन रंगमंच आणि ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या रूपानं पुण्यातील रंगकर्मीसाठी हक्काचा रंगमंच मिळाला. नाटय़चळवळीला बळ देतानाच विविध नाटय़कृतींचा अनुभव देण्याच्या उद्देशाने रंगमहोत्सवाची सुरुवात झाली. पुण्यातील रंगकर्मीना-नाटय़प्रेमींना सहज पाहायला मिळणार नाहीत, असे राष्ट्रीय पातळीवरील अशा नाटकांचा महोत्सवात समावेश असतो. यंदा या महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात होणारी नाटकं दररोज सायंकाळी ७.३० वाजता हिराबागच्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात होणार असून, महोत्सव सशुल्क आहे.

उमाकांत मालवीय यांच्या खंडकाव्यावर आधारित ‘अमरबेली’ हे नाटक सप्तचिरंजीवांच्या आत्मविश्लेषणावर प्रकाश टाकते. अमरत्व प्रदान झाल्यानंतर एक विशिष्ट कालखंड लोटून गेल्यावर व्यतीत केलेल्या जीवनाकडे वळून पाहत असतानाच हे सप्तचिरंजीव स्वतची तुलना ‘अमरबेल’शी (परजीवी) करतात, अशी कल्पना मालवीय यांनी केली आहे. समूहनाटय़ाच्या माध्यमामुळे त्यांचे हे आत्मनिरीक्षणपर नाटय़ अधिक तीव्र होत जाते. ‘दोहरी िझदगी’ या नाटकात राजस्थानात घडणारी गोष्ट पाहायला मिळेल. जवळपासच्याच दोन वेगळ्या खेडय़ात राहणारे दोन घनिष्ट व्यापारी मित्र एकमेकांना आपल्या मुलांचे (जन्माला येण्याआधीच) एकमेकांशी लग्न लावून देण्याचे वचन देतात, परंतु दोघांनाही मुलीच होतात. राजस्थानी लोककलेच्या माध्यमातून समलंगिकतेवर प्रकाश टाकणारे हे नाटक प्रसिद्ध राजस्थानी लेखक विजयदान देठा यांच्या कथेवर आधारित आहे.

अभिनेत्री-लेखिका पूर्वा नरेश, संजय दधीच आणि त्रिशला पटेल या नाटय़कर्मीच्या लेखणीतून अवतरलेल्या चार छोटय़ा गोष्टींचे कोलाज म्हणजेच ‘चार स्मॉल’ ‘दो दिवाने इस शेहर में’, ‘लाश- टिंग इम्प्रेशन’, ‘दद्दू तिवारी’ आणि ‘घर घर’ या चारही कथा बारभोवती फिरत राहतात. ‘तो हाजरी हुआ यूं..’ ‘ आंतर होवत उदासी’ या दोन कथांचे कथन ‘दास्तानगोई’ या पुरातन कथाकथनाच्या प्रकाराने होईल. उर्दू भाषेचे सौंदर्य आणि नजाकत या प्रकारात अनुभवता येते.

हेरोल्ड पिंटर या जगप्रसिद्ध नाटककराची ‘द डंब वेटर’ ही एक गाजलेली नाटय़कृती. दोन गुन्हेगार एका तळघरात त्यांच्या पुढच्या कामगिरीची वाट पाहत आहेत. याच तळघराच्या पाठीमागे एक वेटर खाण्याच्या ऑर्डर्स घेत आहे. हे दोघेही गुन्हेगार वेटरच्या गूढ वागण्यामुळे संभ्रमित झाले आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन तुषार पांडे यांचं आहे.

बलात्काऱ्याला विरोध केल्यामुळे आपल्याला पुढची सात र्वष कारागृहाच्या चार भिंतीआड काढावी लागतील, याची १९ वर्षांच्या रेहाना जब्बारीला कल्पनाही नव्हती. रेहाना जब्बारी यांच्या कारागृहातल्या जग-जीवन- मानवतेविषयीच्या अनुभवांवर ०७-०७-०७ हा नाटय़प्रयोग बेतला आहे.

chinmay.reporter@gmail.com