सोशल मीडियावर लता मंगेशकर यांचे गाणे गावून रातोरात गायिका झालेली रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आहे. रानू मंडलने तिचा पहिला ऑफिशियल म्यूझिक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. बॉलिवूड अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात रानूला गाणे गाण्याची संधी दिली होती. नुकताच तिचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

हिमेश रेशमियाचा लवकरच ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटासाठी रानू मंडलने ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आहे. हे गाणे रेकॉर्ड करताचा रानूचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रानू हिमेशसह उभी राहून गाणे गात असल्याचे दिसत आहे. दरम्यान हिमेश रानूला प्रोत्साहन देत असल्याचे दिसत आहे. रानू लवकरच ‘सुपरस्टार सिंगर’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.

रानू ही मुंबईमध्ये राहणारी आहे. पतीच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी रानू वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर गाणे गात असे. गाणे गाऊन मिळणाऱ्या पैशातून ती तिचे पोट भरत असे. काही दिवसांपूर्वी रानूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रानू रेल्वे स्टेशनवर भारतातील दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे गाणे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि रानू रातोरात स्टार झाली. तिचा सुरेल आवाज ऐकून अनेक गाण्याच्या ऑफर तिला येऊ लागल्या. दरम्यान तिला गाणे गाण्यासाठी कोलकत्ता, केरळ आणि बांगलादेशमध्ये बोलवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.