२५ जून १९८३ या दिवशी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे ही तारीख भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात कोरली गेली आहे. याच क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. या दोन व्यक्तीरेखांवरील पडदा दूर सारल्यानंतर आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे.

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आतापर्यंत रणवीर सिंह आणि जीवा कोणती भूमिका साकारणार हे साऱ्यांनाच ठावूक होतं. त्यानंतर आता आणखी एका भूमिकेचा खुलासा झाला आहे. या चित्रपटामध्ये भारताचा माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साहिल खट्टर साकारणार आहे.

साहिल हा युट्युबर, सूत्रसंचालक आणि अभिनेता आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत साहिल सैय्यद किरमानींची भूमिका करणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, आता एक-एक करत चित्रपटातील भूमिकांवरील पडदे दूर होत आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती.