अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली आज (मंगळवारी) अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागानं (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी रियाला अटक करण्यात आली. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव उघड झाले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.

रियाला अटक झाल्यावर सोशल मीडियावर ट्विट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज मनोज तिवारी यानेदेखील रियाच्या अटकेनंतर एक ट्विट केलं. ‘पेराल तसं उगवेल… आज रियाला झालेली अटक आपल्याला हेच शिकवते की चुकीच्या गोष्टी करणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. सत्य बाहेर येण्याबाबत मी केलेली प्रार्थना लवकरच फळाला येणार!”, असे त्याने ट्विट केले.

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता, त्यावेळीही मनोज तिवारी याने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. “सत्य सामर्थ्यवान आहे आणि ते कायम विजयी होतं. हा निर्णय म्हणजे पहिल्या दिवसापासून सत्यासाठी लढणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांसाठी खरा विजय आहे. माझ्या देशासाठी शतक झळकावताना मला जितका आनंद होतो, तितकाच आनंद मी सध्या अनुभवत आहे. सत्य कायम सर्वांसमोर येण्याचा मार्ग स्वत:चं शोधतं हे या निर्णयातून सिद्ध होतं”, असे त्याने ट्विट केले होते.