19 October 2019

News Flash

Kaagar Trailer : ‘प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ नसतं’

या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे.

'कागर'

सर्वत्र निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. जुनं बुलंद नेतृत्व थोडं बाजूला राहून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी धुरंधर राजकारणी या निवडणुकीत कंबर कसताना दिसतायत. निवडणुकीच्या याच पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाचं वास्तवादी चित्र घेऊन वायाकॉम१८ स्टुडीओज आपल्या भेटीला नवा चित्रपट घेऊन येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित ‘कागर’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पहिल्याच चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली प्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल तीन वर्षानंतर रसिकांच्या भेटीला येतेय. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार’ अशा आरोळ्या देत रिंकू राजगुरू ‘कागर’च्या प्रचाराच्या रणधुमाळीत नव्या जोशात उतरलीय. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ट्रेलरसुद्धा तितकाच दमदार असल्याचं पाहायला मिळत आहे.

ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. तर शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेता या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवतं ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणतं ते राजकारण. एकीकडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा ‘कागर’ २६ एप्रिलपासून रुपेरी पडद्यावर दाखल होतोय.

First Published on April 15, 2019 12:38 pm

Web Title: rinku rajguru kaagar marathi movie trailer released makarand mane shubhankar tawde