ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आज मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या देशात करोनाच्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने त्यांची मुलगी रिधिमा दिल्लीत अडकून पडली आहे. वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी तिने सरकारकडे मुंबईला जाण्याची परवानगी मागितली होती. सरकारने आधी रस्ते मार्गाने जाण्यास तिला परवानगी दिली. मात्र रस्ते मार्गाने दिल्लीहून मुंबईला पोहोचण्यास १२ ते १४ तासांचा अवधी लागू शकतो. कर्करोगाचे रुग्ण असल्याने ऋषी कपूर यांचं पार्थिव जास्त कालावधीसाठी ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे रिधिमा प्रायव्हेट जेटने मुंबईला पोहोचणार आहे. रिधिमा मुंबईला पोहोचल्यावर संध्याकाळी सहा वाजता ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

रिधिमाने सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाबांसोबतचा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “बाबा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि कायम करीत राहीन. माझ्या खंबीर योद्धाच्या आत्म्यास शांती लाभो. मला तुमची आठवण रोज येईल.”

ऋषी कपूर यांची प्रकृती खालावल्यापासून ती मुंबईत येण्याचा प्रयत्न करत होती.मात्र लॉकडाउनमुळे ते शक्य झालं नाही.