सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याला आपल्या चित्रपटाचं प्रमोशन चांगलंच महागात पडलं आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी आयुष आणि दुचाकीवर त्याच्या मागे बसलेली सहकलाकार वरीना हुसैन यांच्याकडून दंड वसूल केला. हे दोघेही वडोदरा इथं चित्रपटाचं प्रमोशन करत होते.

आयुष शर्मा ‘लवरात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयुष आणि त्याची सहकलाकार वरीना हुसैन गुजरातमधील वडोदरा इथं पोहोचले. तिथं आयुषने विना हेल्मेट दुचाकी चालवत चित्रपटाचं प्रमोशन केलं. लोकांनीही या नवोदित कलाकारांना पाहण्यासाठी रस्त्यावर चांगलीच गर्दी केली. या प्रमोशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच वाहतूक पोलीस रात्री आयुष ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथे पोहोचले. वाहतूक नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांकडून दंड वसूल केला.
सेलिब्रिटींनी आपली जबाबदारी ओळखून वाहतूक नियमांचं पालन कारायला हवं, असं वाहतूक पोलीस सहआयुक्त अमिता वनानी यांनी म्हटलं आहे.

वाचा : ‘अल्लादिन’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर 

‘लवरात्री’ या चित्रपटात गुजरातमधील नवरात्रौत्सवादरम्यानची धूम, कल्ला यांची झलक पाहायला मिळणार आहे. त्यातूनच चित्रपटात एक प्रेमकथा साकारली आहे. अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.