प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन निर्मित संगीत संशयकल्लोळ या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग येत्या २२ जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे होणार आहे. सुवर्णमहोत्सवी प्रयोगाचे खास आकर्षण म्हणजे नाटकाच्या या प्रयोगाच्या वेळी खास ‘जलसा’ आयोजित करण्यात आला आहे. नाटय़गीत व शास्त्रीय संगीत गायक आनंद भाटे हे हा जलसा सादर करणार आहेत.
गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले हे नाटक आज शंभर वर्षांनंतरही ताजे व टवटवीत असून नाटकातील नाटय़पदे आजही रसिकांच्या ओठावर आहेत. मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात संगीत संशयकल्लोळ या नाटकाने स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. संगीत रंगभूमीवर अत्यंत गाजलेले हे नाटक नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनतर्फे हे नाटक रंगभूमीवर नव्याने सादर करण्यात आले आहे.
नाटकाचे संकलन आणि दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केले असून नाटकात गायक राहुल देशपांडे आणि स्वत: प्रशांत दामले व अन्य तरुण कलाकार काम करत आहेत.
सुवर्णमहोत्सवी प्रयोगानिमित्ताने आमचे नाटक तीन अंकी होणार असून एक अंक आनंद भाटे यांनी सादर केलेला ‘जलसा’ असेल. याबाबत ‘रविवार वृत्तान्त’ला माहिती देताना प्रशांत दामले म्हणाले, संगीत संशयकल्लोळ हे नाटक पूर्वी पाच अंकी होते. नाटकातील ‘रेवती’या पात्राच्या घरी हा ‘जलसा’होतो, असे नाटकात दाखविले आहे. संगीत संशयकल्लोळच्या नाटकातील या ‘जलसा’साठी त्या काळातील दिग्गज गायक मंडळींनी त्या वेळी आपले गाणे यात सादर केले होते. यात पं. भीमसेन जोशी, पं. जीतेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे आदींचा समावेश होता.
संशयकल्लोळच्या सुवर्णमहोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने जुन्या काळातील हा ‘जलसा’ पुन्हा सादर करावा, असा विचार मनात आला व तो प्रत्यक्षात येत आहे. गायक आनंद भाटे या ‘जलसा’मध्ये सहभागी होणार असून ते त्यांची काही पदे सादर करणार आहेत. रसिक प्रेक्षकांसाठी ही खास भेट व आकर्षण ठरेल. ‘जलसा’चा हा प्रयोग रसिकांनाही नक्की आवडेल, असा विश्वासही दामले यांनी व्यक्त केला.