अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’मधली सहकलाकार संजना सांघीची पोलिसांनी चौकशी केली. मंगळवारी तब्बल नऊ तास तिची चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान तिला #MeToo मोहिमेअंतर्गत सुशांतवर झालेले आरोप व त्याच्या नैराश्याबाबत अनेक प्रश्न विचारले गेले.

२०१८ मध्ये ऑडिशन दिल्यानंतर कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाने चित्रपटासाठी निवड केल्याचं तिने सांगितलं. मुकेशने ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा केलंय. चित्रपटाच्या सेटवरच सुशांत आणि संजनाची पहिल्यांदा ओळख झाली होती.

मी सुशांतवर ‘मी टू’चे कोणतेही आरोप केले नव्हते आणि तशाप्रकारची कोणतीच घटना झाली नव्हती, हे तिने पोलिसांसमोर स्पष्ट केलं. २०१८ मध्ये जेव्हा ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्री पुढे येऊन त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा खुलासा करत होते. तेव्हा संजनाबद्दल कोणीतरी अफवा पसरवली होती, असं ती म्हणाली.

आणखी वाचा : सुशांतने महिन्याभरात बदलले होते ५० सिमकार्ड्स; नेमकं काय आहे प्रकरण?

“चित्रपटाची बरीचशी शूटिंग झाली होती आणि पुढील शूटिंग सुरू होईपर्यंत माझ्याकडे बराच वेळ होता. म्हणून मी आईसोबत अमेरिकेला गेले होते. माझ्या नावाने सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतवर आरोप केले जात असल्याची कल्पनाच मला तेव्हा नव्हती. अमेरिकेहून परतल्यावर या गोष्टी मला समजल्या आणि तेव्हा लगेचच मी सोशल मीडियावर सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं होतं. पण या घटनेमुळे सुशांत फार निराश होता. मी टू मोहिमेचा वापर करून माझ्यावर कशाप्रकारे खोटे आरोप केले जात आहेत आणि कशाप्रकारे ट्रोल केलं जातंय हे त्याने मला सांगितलं होतं.”, असं तिने स्पष्ट केलं.

सुशांतवर जेव्हा ‘मी टू’चे आरोप झाले, तेव्हा ते खोटे असल्याचं स्पष्ट करण्यासाठी त्याने संजनासोबतचं चॅट सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. याविषयी संजना पुढे म्हणाली, “त्यावेळी माझा आणि सुशांतचा संपर्क होऊ शकत नव्हता आणि त्या आरोपांमुळे तो फार त्रस्त होता. खोटे आरोप नाकारण्यासाठी त्याला आमच्या चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकावा लागला होता. मला त्यात काही अयोग्य वाटत नाही.”

शूटिंगदरम्यान सुशांत तणावाखाली आहे किंवा नैराश्यात आहे असं कधीच वाटलं नव्हतं. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल तो कधीच चर्चा करत नव्हता. तो फक्त कुटुंबीयांबद्दल मजेशीर किस्से सांगायचा. त्यामुळे त्याच्या नैराश्याबद्दल अजिबात जाणीव नव्हती, अशी माहिती संजनाने पोलिसांना दिली.