पुलवामा येथे भारतीय जवानांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशवादी तळावर २६ फेब्रुवारी रोजी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हे दहशतवादी तळ उद्धवस्त झाले आणि अनेक दहशतवादी मारले गेले. भारतीय हवाई दलाच्या याच शौर्यगाथेवर आता चित्रपट तयार केला जाणार आहे. निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. यासंदर्भातील माहिती प्रोडक्शन हाऊसच्या औपचारिक इन्स्टाग्राम पेजवरुन देण्यात आली आहे.

भन्साळी प्रोडक्शनने दिलेल्या माहितीनुसार ‘संजय लीला भन्साळी, भूषण कुमार मनवीर जैन आणि प्रज्ञा कपूर हे संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मीत करणार आहेत. सतत लढण्याची आणि कधीही हार न मानणाऱ्या भारतमातेच्या पुत्रांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे,” असं म्हटलं आहे. तसेच “या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिषेक कपूर करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भारतीय हवाई दलाचे यश साजरे करण्यासाठी केली जात आहे,” असंही भन्साळी प्रोडक्शनच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फेब्रुवारी महिन्यात जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४१ जवान शहीद झाले होते. एअर स्ट्राइक करत भारताने या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवला. पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली.

२६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी भारताचे मिग २१ विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळून भारतीय हवाई दलाचे विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. मात्र त्या परिस्थितीमध्येही ते खंबीर आणि तेवढ्याच निडरतेने उभे राहिले. त्यांनी आपल्या हवाई दलाची तसेच मोहिमेची कोणतीही माहिती पाकिस्तानला दिली नाही. भारताने आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर काही दिवसांमध्ये पाकिस्तानला अभिनंदन यांना सोडण्यास भाग पाडले. त्यामुळेच आता वर्धमान यांच्या जीवनावर आणि बालाकोटवर आधारित चित्रपटाची निर्मित करण्यासाठी अनेक निर्माते, दिग्दर्शक पुढे सरसावले आहेत. वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या सहा वैमानिकांचा त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आले. विंगकमांडर अमित राजन, स्वाड्रन लिडर राहुल बसोया, पंकज भुजाडे, बी.एन.के रेड्डी आणि शशांक सिंग या वैमानिकांना हवाई दलाकडून वायूसेना पदक (मेडल ऑफ गॅलेंट्री) देण्यात आला आहे.

वर्धमान यांची कामगिरी

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात भारतीय हवाईदल आणि पाकिस्तानी हवाई दलाच्या विमाने समोरासमोर आली. यावेळी अभिनंदन यांनी मिग २१ बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ १६ फायटर विमानावर वर आर- ७३ मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले अॅमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग २१ बायसन विमानाला धडकले. त्यानंतर अभिनंदन यांचे मिग-२१ पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. भारताने चहूबाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले.

बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये या सहा वैमानिकांचा सहभाग होता. मिराज- २००० या लडाऊ विमानांच्या तुकडीने २६ फेब्रुवारीच्या रात्री बालाकोट येथे हवाई हल्ला करत तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते. भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा पार करत आठ किलोमीटरपर्यंत आतमध्ये जाऊन मिराज २००० च्या मदतीने स्पाइस २००० बॉम्ब निर्देशित करण्यात आलेल्या ठिकाणी पाडले होते. हल्ल्याच्या दिवशी ‘लो क्लाउड बेस’ म्हणजेच ढगाळ वातावरण असल्याने वैमानिकांना ‘क्रिस्टल मेज’ शस्त्राचा वापर करता आला नाही. मात्र लढाऊ विमानांमधील सहापैकी पाच स्पाइस २००० बॉम्ब या तुकडीने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रांवर टाकले होते.